पुण्यातील पाऊस परिस्थितीवर उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी भाष्य केले आहे (फोटो - सोशल मीडिया)
Ajit pawar on Pune rain : पुणे : महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईसह उपनगरांमध्य तुफान पाऊस कोसळत असून पुण्यामध्ये देखील पावसाचा जोर वाढला आहे. कालपासून पुण्यासह आजूबाजूच्या परिसरामध्ये पावसाची संततधार सुरु असून सकाळपासून जोरदार सरी कोसळत आहेत. यामुळे नागरिकांचे, विद्यार्थ्यांचे आणि चाकरमान्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी पुणेकरांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
पुणे शहराला हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. यामुळे पुणे महापालिका आणि प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. पालिकेचा आपत्ती व्यवस्था विभाग आणि अग्निशमन दल देखील पूर्ण सतर्कतेने कार्य करत आहे. 15 क्षेत्रीय कार्यालयामध्ये प्रत्येकी दोन अशी एकूण 30 पथके तयार करण्यात आली आहे. कोणत्याही स्वरुपाची आपत्ती असल्याचा अथवा नागरिकांना मदतीची गरज असल्यास पुणे प्रशासन पूर्णपणे तयार असणार आहे. या सर्व तयारीचा आणि परिस्थितीचा पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढावा घेतला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, “राज्यात घाटमाथ्यावर रेड अलर्ट आहे. आज 11 वाजता मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक तर 12 वाजता मंत्रिमंडळाची बैठक आहे. 36 जिल्ह्यांतील प्रशासन अलर्ट मोडवर आहे. सगळे जण परस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. काही ठिकाणी जीवितहानी झाली आहे. त्याचे आकडेवारी 12 वाजेपर्यंत येतील. जनावरे वाहून गेली आहेत. रत्नागिरी, खेड, चिपळून या भागात पाण्याची धोक्याची पातळी वाढली आहे. काही गावं पाण्याखाली आहे,” अशी माहिती अजित पवारांनी दिली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “राज्यातील 10 लाख एकर जमीन पाण्याखाली गेली आहे. पंचनामे काम करण्याचे काम सुरू होतील. जिथे पुराचा फटका, पावसाचा फटका बसला आहे, तिथे बोटीद्वारे नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. तर जलसंपदा विभागाला खबरदारी घेण्याचे आदेश देण्यात आले आहे. बहुतेक ठिकाणी धरणं ओव्हरफ्लो झाली आहे. त्यामुळे पाणी सोडताना खबरदारी घेण्यास सांगण्यात आले आहे. पूर नियंत्रण करण्यासाठी प्रत्येक धरणावर कार्यकारी अभियंता त्या दर्जाचा अधिकारी ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कॅचमेट भागात येवा सुरू आहे. काही नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत आहे. तर शेजारच्या राज्यांची पण मदत घेण्यात येत आहे. कारण त्यांनी खाली पाणी सोडले नाही तर पाणी फुगवटा होऊ शकतो,” असे देखील अजित पवार म्हणाले आहेत.