'भटक्या कुत्र्यासारखी हालत करू अन् महाराष्ट्रात...'; राष्ट्रवादी कॉंग्रेसचा लक्ष्मण हाकेंना इशारा
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केलेल्या टीकेनंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. त्यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी अत्यंत कठोर आणि संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
सुरज चव्हाण म्हणाले, “लक्ष्मण हाके हे केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी उथळ वक्तव्य करत आहेत. ते दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. पुढील आठ दिवसांत त्यांना धडा शिवला नाही, तर आमचं नाव सुरज चव्हाण नाही. त्यांची अवस्था भटक्या कुत्र्यासारखी करू, असा इशारा त्यांनी दिला आहे.
Sharad Pawar : राज-उद्धव ठाकरेंच्या ५ जुलैच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत; समोर आलं मोठं कारण
चव्हाण पुढे म्हणाले की, “हाके यांना महाराष्ट्रात मोकळं फिरू देणार नाही. त्यांना योग्य जागा दाखवण्याची जबाबदारी आता राष्ट्रवादी युवक काँग्रेसची आहे. पुढच्या दहा दिवसांत त्यांनी जर खुलेआम फिरण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही त्यांना थांबवू. भटक्या कुत्र्यांशी कसं वागायचं, हे आम्हाला चांगलंच ठाऊक आहे.”
दरम्यान, लक्ष्मण हाके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आरोप केला होता की, त्यांच्या अर्थ खात्यामुळे ओबीसी विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. मराठा समाजासाठी कार्य करणाऱ्या सारथी संस्थेला निधी दिला जातो, पण महाज्योतीला दुर्लक्ष केलं जातं. त्यामुळे ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही, असा आरोप हाकेंनी केला होता.
हाके यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली असून, राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांना चांगलंच सुनावण्यात येत आहे. त्यांच्या शब्दांचा व्हिडिओ देखील सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
राज्यातील ओबीसी समाजामध्ये शिक्षणाच्या संधींबाबत असलेल्या असंतोषाची पार्श्वभूमी लक्ष्मण हाके यांच्या वक्तव्यामागे आहे. त्यांनी सातत्याने सरकारकडे मागणी केली आहे की, ओबीसी विद्यार्थ्यांना न्याय मिळावा आणि त्यांच्यासाठी निधीच्या बाबतीत भेदभाव होऊ नये. मात्र, त्यांच्या आरोपांचा राजकीय रंग चढू लागला असून, आता त्यावरून पक्षीय पातळीवर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
Pandharpur Wari : माऊलींच्या पालखीत चोपदाराची वारकरी महिलेला धक्काबुक्की; VIDEO व्हायरल
राजकीय विश्लेषकांच्या मते, ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण अधिकच संवेदनशील झालं आहे. अशा पार्श्वभूमीत हाके यांची वक्तव्यं आणि त्यावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसची प्रतिक्रिया, ही निवडणूकपूर्व ध्रुवीकरणाचा भाग असू शकते. या साऱ्या घडामोडींनी ओबीसी समाजातील असंतोष, शासनाची भूमिका आणि राजकीय पक्षांचा दृष्टिकोन या तिन्ही पातळ्यांवर पुन्हा एकदा चर्चा रंगण्याची शक्यता आहे.