माऊलींच्या पालखीत चोपदाराची वारकरी महिलेला धक्काबुक्की; VIDEO व्हायरल
पंढरपूर वारीच्या भक्तिमय वातावरणात, लाखो विठ्ठलभक्तांचा नवा उत्साह ओसंडून वाहत असताना एका धक्कादायक प्रकाराने याला गालबोट लावलं आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात रिंगणादरम्यान घडलेली ही घटना सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका चोपदाराने महिला वारकऱ्याशी उद्धट वागणूक केल्याचं स्पष्टपणे दिसत आहे.
घटना 3 जुलै रोजी सकाळी वेळापूरहून प्रस्थान केलेल्या माऊलींच्या पालखीच्या रिंगण सोहळ्यातील आहे. उघडेवाडी येथे पालखीचे उभे रिंगण पार पडले. यानंतर डोक्यावर तुळस घेऊन काही महिला वारकरी भक्तिभावाने प्रदक्षिणा घालत होत्या. त्याचवेळी पालखीतील मुख्य चोपदार पुढे येऊन अचानक एका महिला वारकऱ्याला ढकलून देतो. त्यामुळे ती महिला थेट समोर बसलेल्या दुसऱ्या वारकऱ्यांवर पडते. विशेष म्हणजे, तिच्या डोक्यावरची पितळेची तुळस कोणावर पडली असती तर मोठा अपघात घडला असता.
या प्रकारानंतरही संबंधित चोपदार महाशय थांबले नाहीत. त्यांनी त्या महिलेशी उद्धटपणे बोलणे सुरूच ठेवले. ‘वारी म्हणजे सेवा, शिस्त आणि प्रेम’ असा वारकऱ्यांचा स्थायीभाव असताना अशा प्रकारचे वर्तनामुळे संताप व्यक्त होत आहे.
नेटीझन्सनी या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त केला असून, संत ज्ञानेश्वर माऊलींना ‘आई’ मानणाऱ्या भक्तांच्या पालखीत महिलांशी अशा प्रकारची वर्तणूक योग्य आहे का? असा प्रश्न अनेकांकडून उपस्थित केला जात आहे. वारीचा मूळ गाभा म्हणजे भक्तिभाव, समता, प्रेम आणि सहिष्णुता. मात्र असा प्रकारांमुळे या मूल्यांना कुठेतरी धक्का पोहोचत असतो.
Manisha Kayande : ‘पंढरीच्या वारीत अर्बन नक्षली’; मनिषा कायंदेंचा सभागृहात गंभीर आरोप
वारीचे व्यवस्थापन अत्यंत काटेकोर असते, मात्र अशा घटनांनी व्यवस्थापनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. संबंधित चोपदारावर कारवाई होणार का, याकडे आता सर्व वारकऱ्यांचे लक्ष लागले आहे. वारीतील ही घटना केवळ एका व्यक्तीच्या चुकीमुळे संपूर्ण वारीच्या सन्मानाला धक्का लावणारी असून, अशा प्रकारच्या वर्तनाला पाठीशी घालणं चुकीचं असल्याचं म्हटलं जात आहे. या घटनेनंतर वारी व्यवस्थापनाने अशा प्रकारच्या उद्धट वर्तनावर नियंत्रण ठेवणं आवश्यक असल्याची मागणी होत आहे.