पाचगणी : नागठाणे (ता.सातारा) येथील उरमोडी नदीपात्रात वाहून गेलेल्या सनी उर्फ मनोज सुधाकर गडकरी (वय.२९) याच्या शोधासाठी बोरगाव पोलिसांनी कराड येथून एन.डी.आर.एफ च्या टीमला मंगळवारी दुपारी पाचारण केले.सायंकाळी उशिरापर्यंत उरमोडी नदीपात्रात त्यांची शोधमोहीम सुरू होती.दरम्यान,मंगळवारी सकाळी पोलीस शोधमोहिमेत हलगर्जीपणा करत असल्याचा आरोप करत मनोज गडकरी याच्या कुटुंबीयांनी व नातेवाईकांनी ग्रामपंचायतीवर आक्रोश मोर्चा काढला होता.
रविवारी सायंकाळी सनी उर्फ मनोज गडकरी हा युवक गावातील प्रकाश कांबळे व प्रवीण सूर्यवंशी या दोन मित्रांसह उरमोडी नदीकाठी मासे पकडण्यासाठी गेला होता.यावेळी प्रकाश कांबळे व मनोज गडकरी हे दोघे पोहण्यासाठी पाण्यात उतरले.मात्र पाण्याच्या वेगवान प्रवाहात दोघेही वाहत गेले.त्यापैकी प्रकाश कांबळे हा पाण्यातून बाहेर येण्यात यशस्वी झाला.मात्र मनोज गडकरी हा वेगवान प्रवाहबरोबर वाहून गेला होता. रविवार सायंकाळपासून बोरगाव पोलिसांबरोबरच नातेवाईक व ग्रामस्थ बेपत्ता झालेल्या मनोज गडकरी याचा नदीपात्राचा दोन्ही बाजूने शोध घेत होती.मात्र दोन दिवस ओलांडूनही त्यांना यश मिळाले नाही.त्याच्या शोधासाठी शासकीय पातळीवर मदत मिळवण्यासाठी बोरगाव पोलीस प्रयत्नशील होते.
मंगळवारी दुपारी अखेर कराड येथे तैनात असलेली एन.डी.आर.एफची १२ जणांची टीम बोटीसह नागठाणे येथे पोहचली.सायंकाळी ४ वाजल्यापासून टीमचे पोलीस निरीक्षक दिलीप कुमार,पोलीस उपनिरीक्षक अंकित कुमार,हवालदार सोमनाथ साळुंखे तसेच बोरगाव पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक वर्षा डाळींबकर, हवालदार एच.बी.सावंत व नागठाणेचे अभिजित ताटे यांनी बोटीच्या साहाय्याने नागठाणे जुना पूल ते माजगाव येथे असलेल्या नदीवरील बंधाऱ्यापर्यंतचा परिसरातील नदीचे दोन्ही काठ पिंजून काढले.मात्र बेपत्ता सनी उर्फ मनोज गडकरी याचा शोध लागला नाही.अंधार पडल्यामुळे अखेर शोधमोहीम थांबवून टीम पुन्हा कराडकडे रवाना झाली.
नातेवाईकांनी काढला आक्रोश मोर्चा
दोन दिवस उलटूनही सनी उर्फ मनोज गडकरी याचा शोध घेण्यास बोरगाव पोलिसांना यश न आल्याने संतप्त कुटुंबीयांनी व नातेवाईकांनी मंगळवारी सकाळी ग्रामपंचायतीवर आक्रोश मोर्चा काढला.यावेळी पोलिसांकडून शोधमोहिमेत हलगर्जीपणा होत असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला.यावेळी सपोनि सी.एम..मछले,सरपंच डॉ.रुपाली बेंद्रे व उपसरपंच अनिल साळुंखे यांनी मोर्चाला सामोरे जात शोधमोहिमेसाठी करत असलेल्या प्रयत्नांची माहिती त्यांना दिली.तसेच प्रशासनाकडून रेस्क्यू टीम पाचारण करणार असल्याची माहिती त्यांना दिली.