Court Decision
मुंबई : अमरावती येथील व्यावसायिक उमेश कोल्हेच्या (Umesh Kolhe Murder Case) हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपी युसूफ खानने (Yusuf Khan)मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए न्यायालयात (NIA Court) जामीनासाठी अर्ज केला आहे. आपण तबलिघी जमातचा सदस्य नसल्याचा दावा आरोपीने याचिकेतून केला आहे. त्यावर राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) न्यायालयाने उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
आरोपी युसुफ खानवर हत्येचा, गुन्हेगारी कटाचा आरोप असून, भारतीय दंड संहिता आणि यूएपीए कायद्यांतर्गंत पुरावे नष्ट केल्याचा गुन्हा एनआयएकडून दाखल करण्यात आला आहे. खान एक पशुवैद्यकीय डॉक्टर असून, एनआयएने तबलिघी जमातचा सदस्य असल्याचे म्हटले आहे. मात्र, त्याबाबत कोणताही पुरावा नसतानाही सहआरोपी म्हणून या खटल्यात उभे केल्याचा दावा याचिकेतून केला आहे. खान बरेलवी स्कूल ऑफ थॉटचे अनुसरण करणारा कट्टर सुन्नी मुस्लिम असून, ‘तबलीगी जमात’चा सदस्य नाही.
एनआयएच्या आरोपपत्रात या आरोपाला पुष्टी देण्यासाठी कोणतेही दस्तऐवज, पुरावे नाहीत किंवा कोणत्याही साक्षीदाराने खानवर आरोप केलेला नाही. त्यामुळे यूएपीए किंवा आयपीसीच्या तरतुदी लागू करण्यासाठी तसेच खानचा (कोल्हेची) हत्या करण्यामागील हेतू सिद्ध करण्यास एनआयएला यश आलेले नाही, असेही जामीन अर्जात नमूद करण्यात आले आहे. खानने १५ जून २०२२ रोजी कथितरित्या फॉरवर्ड केलेला व्हॉट्सअॅप मेसेज युक्तिवादासाठी खरा मानला तरीही, या संदेशानंतर, खान कथित मास्टरमाईंडला भेटला किंवा या प्रकरणातील इतर कोणत्याही आरोपीशी संपर्क साधल्याचा कोणताही आरोप किंवा प्राथमिक पुरावा तपास यंत्रणेने सादर केला नसल्याचेही याचिकेत म्हटले आहे.
त्यामुळे अर्जदार कोणत्याही कटाचा भाग नव्हता, असा दावा सत्र न्यायालयातील विशेष न्यायाधीश राजेश कटारिया यांच्यासमोर करण्यात आला. त्याची दखल घेऊन न्यायालयाने एनआयएला १८ फेब्रुवारी रोजी उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले.
काय आहे प्रकरण
नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ समाज माध्यमावर संदेश प्रसारीत केल्यामुळे अमरावती येथील व्यावसायिक उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली. २१ जून रोजी अमित मेडिकल्सचे संचालक उमेश कोल्हे हे दुकान बंद करून मोटर सायकलने घरी जात असताना रात्री १०.३० च्या सुमारास चाकूने वार करून त्यांची हत्या करण्यात आली. राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) या प्रकरणाचा तपास सोपविण्यात आल्यानंतर ११ जणांना अटक करण्यात आली असून दोन आरोपी अद्यापही फरार आहेत. एनआयएने या प्रकरणात आरोपपत्र दाखल केले आहे. तर कथित मास्टरमाईंड इरफान खानने प्रेषित मोहम्मद यांच्या “अपमानाचा” बदला घेण्यासाठी कोल्हे यांची हत्या करण्यासाठी “दहशतवादी टोळी”चे नेतृत्व केले होते. त्याचाच युसूफ एक सदस्य असल्याचे एनआयएने म्हटले आहे.