मोठी बातमी! रस्ते अपघात पीडितांना आता मिळणार मोफत उपचार, नितीन गडकरींची घोषणा (फोटो सौजन्य-X)
Nitin Gadkari news in Marathi: रस्ते अपघातात जखमी झालेल्या लोकांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी केंद्र सरकारने मोठी मदत जाहीर केली आहे. केंद्र सरकारने मंगळवारी (6 मे) देशभरातील रस्ते अपघातातील पीडितांसाठी कॅशलेस उपचार योजनेची घोषणा करणारी अधिसूचना जारी केली. रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या राजपत्रित अधिसूचनेनुसार, या योजनेअंतर्गत, पीडित व्यक्ती अपघाताच्या तारखेपासून सात दिवसांपर्यंत कोणत्याही मान्यताप्राप्त रुग्णालयात जास्तीत जास्त १.५ लाख रुपयांपर्यंत कॅशलेस उपचार घेऊ शकते. ही योजना ५ मे २०२५ पासून लागू झाली आहे.
केंद्र सरकारच्या अधिसूचनेनुसार, “कोणत्याही रस्त्यावर मोटार वाहनामुळे झालेल्या अपघातात बळी पडलेल्या कोणत्याही व्यक्तीला या योजनेच्या तरतुदींनुसार कॅशलेस उपचार मिळण्याचा अधिकार असेल.” या वर्षी जानेवारीच्या सुरुवातीला केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी भारतातील वाढत्या रस्ते अपघातांबद्दल चिंता व्यक्त करत घोषणा केली होती की सरकार लवकरच रस्ते अपघातातील पीडितांसाठी अशी योजना आणण्याचा विचार करत आहे.
एका वृत्तानुसार, राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण (एनएचए) ही योजना राबविण्यासाठी राज्य पोलिस, रुग्णालये आणि राज्य आरोग्य एजन्सी यांच्या सहकार्याने काम करेल. भारतात दरवर्षी सुमारे ५ लाख लोक रस्ते अपघातात मृत्युमुखी पडतात. तर सुमारे ४ लाख लोक गंभीर जखमी होतात. एका अहवालानुसार, याचा सर्वाधिक परिणाम दुचाकी चालक आणि पादचाऱ्यांना होतो.