
No candidate has filed his nomination in the Mangalwedha Municipal Council elections 2025
Local Body Elections 2025: मंगळवेढा : राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर जोरदार राजकारण देखील रंगले आहे. राज्य निवडणूक आयोगाने पहिल्या टप्प्यामध्ये नगर परिषद आणि नगर पंचायतच्या निवडणूका जाहीर झाल्या आहेत. सार्वत्रिक निवडणुकीकरीता २ डिसेंबर रोजी मतदान व ३ डिसेंबर 2025 रोजी मतमोजणी होणार असल्यान या सर्व नगरपरिषदांच्या कार्यक्षेत्रात ४ नोव्हेंबर २०२५ पासून आचारसंहिता लागू झाली आहे. मंगळवेढ्यामध्ये आजच्या दिवशी एकाही व्यक्ती उमेदवारी अर्ज दाखल केलेला नसल्याचे समोर आले आहे.
मंगळवेढा नगरपरिषद पंचवार्षिक निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसर्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही. दरम्यान नगरपरिषद प्रशासकीय यंत्रणा संपूर्ण उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्यासाठी सज्ज असताना दि.12 ही अशुभ तारीख मानली जात असल्याने उमेदवार अर्ज भरण्यास अशुभ असल्याने ते आले नसल्याचे परिसरात खमंग चर्चा ऐकायला मिळत होती. निवडणूक कार्यालयातील कर्मचारी मात्र उमेदवार अर्ज भरण्याच्या प्रतिक्षेत असल्याचे चित्र होते.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद निवडणूका कार्यक्रम जाहीर केला असून सोमवार दि.10 पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे. मंगळवेढयात मात्र मागील तीन दिवसांत केवळ एक अर्ज दाखल झाला आहे. बुधवार दि.12 रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 पर्यंत एकही उमेदवार अर्ज भरण्यासाठी फिरकला नसल्याने नगरपरिषद परिसरात चक्क शुकशुकाट जाणवत होता. यामागील कारण जाणून घेतले असता दि.12 तारीख ही अशुभ असल्याने उमेदवार अर्ज भरण्यास आले नसल्याची चर्चा कार्यालयीन परिसरात सुरू होती.
शक्यतो उमेदवार हा अर्ज भरताना शुभ दिवस शुभ वेळ बघूनच उमेदवारी अर्ज दाखल करत असल्याचा आजपर्यंतचा अनुभव आहे. या अनुभवावरच बुधवारी दि.12 रोजी उमेदवारांनी अर्ज भरण्यास पाठ फिरवली असल्याचे चित्र पहायला मिळाले. नगरपरिषद निवडणूकीसाठी 28 हजार 638 मतदार असून यामध्ये 14 हजार 251 पुरूष मतदार तर 14 हजार 385 स्त्री मतदार आहेत. दरम्यान नगरपरिषदेच्या खुर्चीसाठी महिला आरक्षण असून या निवडणुकीत सर्वाधिक मतदार हे आकडेवारीवरून महिलाच जास्त असल्याचे स्पष्ट होत आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
| प्रभांग क्रमांक | प्रभाग निहाय मतदार संख्या |
|---|---|
| प्रभाग क्र.1 | 2380 |
| प्रभाग 2 | 2853 |
| प्रभाग 3 | 2297 |
| प्रभाग 4- | 3047 |
| प्रभाग 5 | 2349 |
| प्रभाग 6 | 3306 |
| प्रभाग 7 | 2998 |
| प्रभाग 8 | 2931 |
| प्रभाग 9 | 3102 |
| प्रभाग 10 | 3375 |
अशी एकूण 10 प्रभागामध्ये 28 हजार 638 मतदारांची संख्या आहे. दरम्यान निवडणुक प्रक्रियेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी मदन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा मगर, संतोष जाधव, वरिष्ठ लिपिक रामभाऊ पवार, तुषार नवले, सुनिल सोनटक्के, सुनिल सुर्यवंशी, कार्यालयीन अधिक्षक सचिन मिसाळ, निरीक्षक तृप्ती रसाळ, लेखापरिक्षक गिता वाडेकर आदि परिश्रम निवडणूकीसाठी घेत आहेत.