भाईंदर/ विजय काते :राज्यातील परिचारिका संघटनांनी त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आझाद मैदानात धरणे आंदोलनाचे आयोजन केले असून, सरकारने त्वरित योग्य तो प्रतिसाद न दिल्यास येत्या १८ जुलै २०२५ पासून राज्यव्यापी बेमुदत कामबंद आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मीरा भाईंदर शहरातील भीमसेन जोशी रुग्णालय, भाईंदर पश्चिम येथे परिचारिका आणि नर्सेसनी दोन दिवसीय धरणे आंदोलन सुरू केले आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर परिचारिकांनी सहभाग घेतला असून, त्यांच्या न्याय्य मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जात आहे.
काय आहेत प्रमुख मागण्या
1. फेस बायोमेट्रिक हजेरी प्रणालीतून वगळणे – तिन्ही पाळ्यांमध्ये कर्तव्य बजावणाऱ्या परिचारिकांना कामकाज रेकॉर्डिंगनंतरच कक्ष सोडता येतो. त्यामुळे बायोमेट्रिक हजेरी प्रणाली अडचणीची ठरते आणि ती वेतनाशी जोडलेली असल्याने तातडीने त्यातून वगळण्याची मागणी आहे.
2. सर्व रुग्णालयांमध्ये पाळणाघर व चेंजिंग रूम उपलब्ध करून द्याव्यात.
3. रुग्णसंख्येच्या तुलनेत अपुरे मनुष्यबळ, परिणामी परिचारिकांवर अतिरिक्त प्रशासनिक कामाचा ताण येतो. त्यामुळे डेटा एंट्री ऑपरेटर नेमून परिचारिकांना कारकुणी कामातून मुक्त करण्यात यावे.
4. महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील प्रोत्साहन भत्ता सप्टेंबर २०१८ पासून लागू करण्यात यावा.
5. परिविक्षाधीन कालावधी आणि स्थायित्व प्रमाणपत्रे विनाविलंब देण्यात यावीत.
6. GNM विद्यार्थी परिचारिकांचे विद्या वेतन अपुरे असून, ते BSc नर्सिंगप्रमाणे वाढवण्यात यावे.
या आंदोलनामुळे रुग्णसेवा कोलमडण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे शासनाने त्वरित याची दखल घेऊन सकारात्मक चर्चा करून निर्णय घ्यावा, अन्यथा राज्यातील आरोग्यसेवा ठप्प होण्याचा धोका निर्माण होईल, असा इशारा संघटनांनी दिला आहे.