
कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्षीदार असलेल्या पावनखिंड परिसराबाबत राज्य सरकारकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अनेक शिवप्रेमी ट्रेकर्स पन्हाळगड ते विशालगड असा ट्रेक करत असतात. याठिकाणी सुविधांचा अभाव असल्याची खंत अनेकवेळा बोलली जात होती. यानंतर आता ‘पन्हाळा-पावनखिंड मार्गावर विश्रामगृह बांधण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे पर्यटन व्यवसायाला देखील चालना मिळणार आहे.
पन्हाळा-पावनखिंड मार्गावर मुक्कामाच्या ठिकाणी तीन गावांमध्ये विश्रामगृहे बांधण्यात येणार असल्याची माहिती खासदार धैर्यशील माने यांनी दिली आहे. पत्रकार परिषद घेत याबद्दल त्यांनी माहिती दिली आहे. ‘पन्हाळा-पावनखिंड मार्गावर मुक्कामाच्या ठिकाणी तीन गावांमध्ये विश्रामगृहे बांधण्यासाठी चौदा कोटी 94 लाख 45 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. खोतवाडी, करपेवाडी आणि पांढरेपाणी या ठिकाणी सुसज्ज हॉल उभारले जातील. तीन ठिकाणी मिळून 1400 जणांची राहण्याची सोय होणार आहे. अशी माहिती खासदार धैर्यशील माने यांनी सांगितली आहे.
छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची गाथा सांगणाऱ्या पावनखिंड परिसराचा कायापालट करण्यात येणार आहे. स्वातंत्र्यांच्या अमृतमहोत्सवसाठीच्या एकछत्र योजनेंतर्गत पावखनिखंड मार्गावर विश्रामगृहे बांधण्यात येणार आहेत. करपेवाडी, पंढरेपाणी येथे ५५० शिवभक्त मुक्काम करतील अशी व्यवस्था असेल. खोतवाडी येथे २२५ शिवभक्त राहतील अशी व्यवस्था करण्यात येईल. हॉलमध्ये पुरेश स्वयंपाकगृह, स्वच्छतागृहे, भोजन हॉल व्यवस्था असेल. हॉलचा दर्शनी भाग ऐतिहासिक इमारतीस साजेसा असेल.
शिवाय पन्हाळा-पावनखिंड मार्गावर दिशादर्शक फलक, माहिती फलक, मार्गावरील गावाच्या शेजारी स्वच्छतागृह बांधण्यात येणार आहेत. तसेच मार्गदर्शनासाठी ठिकठिकाणी सुमारे ४० फूट उंचीचे ध्वजस्तंभ प्रस्तावित आहे. शिवभक्तांची पावनखिंड मार्गावर मुक्कामाची व्यवस्था व्हावी यासाठी शिवराष्ट्र परिवाराचे अध्यक्ष प्रशांत साळुंखे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, यांच्याकडे पत्राकडे मागणी केली होती. त्यानुसार हा प्रस्ताव आता मार्गी लागला आहे. पत्रकार परिषदेला मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे, शिवराष्ट्र परिवाराचे साळुंखे आदी उपस्थित होते.