उरुळी कांचन : जेजुरी राज्य मार्गावरील शिंदवणे ग्रामपंचायत हद्दीत नव्या कालव्याचा लोखंडी कठडा तोडून एक चारचाकी पाण्यात पडली असून, या घटनेत एकाचा जागेवरच मृत्यू झाला आहे तर तिघेजण जखमी झाले आहेत.
अमर साहेबराव घाडगे (वय- २८, रा. जुन्नर,) असे अपघातात मृत्यू पावलेल्या चारचाकी चालकाचे नाव आहे. तर या अपघातात गणेश संजय थोरात (वय- २२), शुभम शंकर इंगोले (वय- २१, रा. दोघेही, केसनंद, वाघोली, ता. हवेली), व आदित्य महादेव तावरे (वय- २०, रा. जुन्नर,) असे जखमी झालेल्या तिघांची नावे आहेत. आज गुरुवारी (ता. २३) सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे चौघेजण बकऱ्या विकण्याचा व्यवसाय करतात. आज सकाळी फलटण येथील बाजार असल्याने चौघेजण चारचाकी (एम एच १६ किंवा ४६ जीयु ७९८१) गाडीतून निघाले होते. शिंदवणे येथील कालव्यावर आले असता अमरचे गाडीवरील नियंत्रण सुटले व गाडी कठडा तोडून थेट कालव्यात जाऊन पडली.
दरम्यान, ही माहिती मिळताच शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी व सचिन उर्फ बाळा महाडिक यांनी तात्काळ मदत केली. यावेळी चौघांना गाडीतून बाहेर काढले. त्यात तिघेजण किरकोळ जखमी झाले, तर चालक अमर घाडगे याचा जागेवरच मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले आहे.
दरम्यान या अपघातानंतर शिंदवणे गावचे माजी सरपंच गणेश महाडिक यांनी, या पुलाचे रुंदीकरणाचे व नुतनीकरणाचे काम तातडीने सुरू केले नाही तर उद्यापासून ग्रामस्थांसह आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. ते म्हणाले की, “ऑक्टोबर २०२३ मध्ये मी रस्त्याच्या कामांसाठी व या पुलाच्या कामासाठी उपोषण केले होते. त्यावेळी मला बांधकाम व पाटबंधारे खात्याने या पुलाच्या रुंदीकरणाचे व नूतनीकरणाचे कामासाठी दोन कोटी रुपये मंजूर झाले असून, लवकरच काम सुरू करण्यात येईल असे आश्वासन दिले होते, मात्र अद्याप हे काम सुरू न झाल्याने या ठिकाणी अपघातांची संख्या वाढलेली आहे.”
सकाळी साडेसहाला झालेल्या घटनेची माहिती पोलिसांना स्थानिक ग्रामस्थांनी देण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणीही उपलब्ध न झाल्याने पोलिसांपर्यंत ही माहिती पोहोचू शकली नाही, पोलीस घटनास्थळी येण्यास सुमारे दोन तासाचा कालावधी गेला. त्यामुळे अपघातग्रस्तांना तातडीची मदत करण्यास ग्रामस्थांना अडचणीला सामोरे जावे लागले. दोन तासांनी दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी हजेरी लावली असल्याचे अपघातस्थळी मदत कार्य करणाऱ्या काही नागरिकांनी सांगितले.
Web Title: One person died and three others were injured in an accident where a car fell into a canal uruli kanchan accident nrpm