
फोटो सौजन्य: Gemini
गेल्या ८ ते १० वर्षांपासून कांद्याला अपेक्षित दर मिळत नसल्याचे चित्र आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही कांद्याच्या भावाने शेतकऱ्यांना रडवले असून, या परिस्थितीचा फायदा घेत व्यापारी मात्र मोठ्या प्रमाणात नफा कमावताना दिसत आहेत. शेतकऱ्यांकडून अत्यल्प दराने खरेदी केलेला कांदा ग्राहकांना मात्र १५ ते २० रुपये प्रतिकिलो दराने विकला जात असल्याचे चित्र सध्या नगर जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये पाहायला मिळत आहे.
Shivsena : “आम्ही फोटो आणि पीपीटी दाखवत नाही, काम करून दाखवतो…”, शायना एन.सी. यांचा उबाठावर हल्लाबोल
शहरातील उपनगरीय भाजीबाजारांचा आढावा घेतला असता, कांद्याचे दर १५ ते २५ रुपये प्रतिकिलो असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, हाच कांदा शेतकऱ्यांकडून १ रुपयापर्यंतच्या कवडीमोल दराने खरेदी केला जात आहे. या तफावतीवर सरकार ठोस उपाययोजना करणार का, असा सवाल उपस्थित होत असून हमीभावाबाबत कोणतीही ठोस कृती न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
उन्हाळी हंगामातील जुना कांदा संपल्यानंतर सध्या बाजारात नवीन लाल कांदा दाखल झाला आहे. मात्र, या कांद्यालाही योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. पाथर्डी तालुक्यातील धारवाडी येथील शेतकरी अर्जुन सोनवणे यांना त्यांच्या कांद्याला अवघा १ रुपया प्रतिकिलो दर मिळाल्याने, बाजारात माल नेण्यासाठीचे गाडीभाडेही स्वतःच्या खिशातून भरावे लागले, ही घटना कांदाउत्पादकांच्या डोळ्यांत पाणी आणणारी ठरली आहे.
कांद्याच्या शेतीसाठी लागणारा खर्चही सध्याच्या दरात वसूल होणे अशक्य झाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी बँकांकडून कर्ज घेऊन पीक घेतले असून, ते कसे फेडायचे हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. दुसरीकडे, व्यापारी मात्र शेतकऱ्यांच्या अडचणींचा फायदा घेत कवडीमोल दरात कांदा खरेदी करून तो ग्राहकांना अवाच्या सव्वा दराने विकत असल्याचे चित्र ग्रामीण भागात सर्रास पाहायला मिळत आहे. यातून शेतकऱ्यांची उघड लूट आणि ग्राहकांची फसवणूक होत असल्याचा आरोप केला जात आहे.