"आम्ही फोटो आणि पीपीटी दाखवत नाही, काम करून दाखवतो...", शायना एन.सी. यांचा उबाठावर हल्लाबोल
मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना शायना एन.सी. यांनी उबाठावर जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या की, महायुती सरकारच्या कार्यकाळात प्रदूषण नियंत्रणासाठी ठोस आणि प्रभावी योजना राबवण्यात आल्या, ज्या उबाठाच्या कार्यकाळात कधीच पाहायला मिळाल्या नाहीत. उबाठाने अंडरग्राउंड मेट्रोसारख्या महत्त्वपूर्ण विकास प्रकल्पांना विरोध केला. याउलट, महायुती सरकारने जनहित आणि विकासाला प्राधान्य देत असे निर्णय घेतले, जे उबाठाचे सरकार घेण्यात अपयशी ठरले.
शायना एन.सी. पुढे म्हणाल्या, “आम्ही केवळ फोटो आणि पीपीटी दाखवण्यात विश्वास ठेवत नाही, तर प्रत्यक्ष काम करून दाखवतो.” उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. मुंबईत ३०० एकर जागेवर ग्रीन पार्क विकसित करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच कोस्टल रोडसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांमुळे नागरिकांचा वेळ वाचत असून इंधनाचा वापर कमी होत आहे, त्यामुळे प्रदूषणातही घट होत आहे. मेट्रो प्रकल्प आणि इलेक्ट्रिक बसेस स्वच्छ व हरित मुंबईच्या दिशेने महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
शायना एन.सी. यांनी पुढे माहिती देताना सांगितले की, एका सर्वेक्षणानुसार येणाऱ्या निवडणुकीत सुमारे १.८५ कोटी मतदार प्रथमच मतदान करणार आहेत. या मतदारांना कोणत्या मुद्द्यांवर मतदान करणार, असे विचारले असता त्यांनी एअर क्वालिटी इंडेक्स, प्रदूषण, शिक्षण, आरोग्यसेवा आणि मोकळ्या जागांना प्राधान्य दिले. भावी पिढीचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या दिशेने पुढेही अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलली जातील.






