एसटीच्या ताफ्यात ८ हजार नवीन बसेस वर्षाअखेरपर्यंत दाखल करा, प्रताप सरनाईक यांचा सज्जड दम
यावेळी मंत्री सरनाईक यांनी एसटीच्या विविध विभागांकडून सुरू असलेल्या संथ व कूर्मगती कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, सन २०२५–२६ च्या अर्थसंकल्पात एसटीसाठी शासनाने २४६० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मात्र आर्थिक वर्ष संपण्यास अवघे तीन महिने शिल्लक असताना त्यापैकी सुमारे १६०० कोटी रुपये खर्चाविना परत जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे, ही अत्यंत गंभीर बाब आहे.
हा निधी सर्वसामान्य जनतेच्या करातून आलेला असून तो प्रवाशांच्या मूलभूत सुविधा नवीन बसेस खरेदी, बसस्थानकांची उभारणी, दुरुस्ती व नूतनीकरण यासाठी वापरणे अपेक्षित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. परंतु बसेस खरेदी व बसस्थानकांच्या कामांच्या निविदा प्रक्रिया गेल्या नऊ महिन्यांपासून रेंगाळल्यामुळे निधी खर्च होऊ शकलेला नाही, याला संबंधित विभागांचे अकार्यक्षम अधिकारी जबाबदार असल्याचा ठपका त्यांनी ठेवला.
उर्वरित तीन महिन्यांत जास्तीत जास्त निधी खर्च करून प्रवाशांसाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा नवीन बसेस, बसस्थानके, प्रसाधनगृहे आदींच्या निर्मितीसाठी आवश्यक निविदा व प्रशासकीय प्रक्रिया तातडीने पूर्ण करून प्रकल्पांना गती देण्याचे स्पष्ट निर्देश यावेळी मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.
प्रवाशांच्या सोयी-सुविधांना सर्वोच्च प्राधान्य देत एसटीचे आधुनिकीकरण वेगाने केले जाणार असून त्यासाठी प्रशासनाने जबाबदारीने काम करावे, असेही त्यांनी ठामपणे नमूद केले.






