घोडेगाव : चालू हंगामात अनेक कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांद्याचा भाव (Onion Prices) भविष्यात वाढेल, या उद्देशाने बराखीतच कांदा साठवून ठेवला आहे. मात्र, जुलै महिना संपायला आला तरी कांद्याचे भाव वाढत नाहीत. त्यामुळे बळीराजा चांगलाच चिंताग्रस्त झाला आहे.
एप्रिल ते मे महिन्यादरम्यान भरघोस कांद्याची काढणी झाली. प्रमाणापेक्षा जास्त आवक असल्याने बाजारभाव कमी असतो, म्हणून अनेक शेतकरी बराखीत कांदा साठवून ठेवत असतात. सद्यस्थितीत १० किलोस १२० ते १३० असा प्रतवारीनुसार बाजारभाव सुरू आहे. परंतु, हा बाजारभाव उत्पादन खर्च व साठवणूक खर्च याचा विचार करता अतिशय अल्प आहे.
…तर कांदा बराखीत सडण्याची भीती
उत्पादन खर्च व साठवणूक करुन ठेवलेला कांदा याचा भांडवली खर्च तेव्हाच मिळतो, जेव्हा दहा किलोस २५० रुपयांपेक्षा जास्त बाजारभाव असतो. असा बाजारभाव मिळाला तर किमान भांडवली खर्च जाऊन थोडासा नफा शिल्लक राहू शकतो. दरम्यान, शेतकऱ्यांना कांद्याचे भाव लवकरच वाढतील, अशी आशा आहे. बराखीतील कांदा जर लवकर विकला नाही तर सडून खराब होणार व कमी बाजारभावात कांदा विकला गेला तरी नुकसानच होणार. त्यामुळे शेतकऱ्यांची द्विधा मनस्थिती झाली.
बाजारभाव वाढण्याची अपेक्षा
मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी कांदा जास्त प्रमाणात साठवला आहे. नवीन कांदा बाजारात आला तर अजून बाजार खाली येतील. असे असले तरी लवकरच बाजारभाव वाढतील याच आशेवर कांदा उप्तादक शेतकरी आहे.