पुणे : कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावर भरधाव ट्रकने दुचाकीस्वार दामप्तयाला धडक देऊन झालेल्या अपघातात सहप्रवासी महिलेचा मृत्यू झाला. तर, दुचाकीस्वार पती जखमी झाला आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोमवारी सकाळी पावणे आकरा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे.
वैशाली विजय कांबळे (वय ३९, रा. धायरी) असे मृत्यू झालेल्या सहप्रवासी महिलेचे नाव आहे. अपघातात वैशाली यांचे पती विजय कांबळे (वय ४२) हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात ट्रक चालक दिपक ज्ञानदेव हुले (वय ३७) याच्यावर गुन्हा नोंद केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय रेल्वेमध्ये तिकीट तपासनीस म्हणून काम करतात. ते मुंबईत नियुक्तीस आहेत. त्यांनी पारपत्र मिळवण्यासाठी अर्ज केला होता. त्यासाठी ते पत्नीला घेऊन जात होते. कांबळे मूळचे बारामतीचे आहेत. पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या पारपत्र पडताळणीसाठी कांबळे दाम्पत्य दुचाकीवरुन बारामतीकडे निघाले होते. सकाळी अकराच्या सुमारास नवले पुलाकडून कात्रजकडे जाणाऱ्या बाह्यवळण मार्गावर भरधाव ट्रकने दुचाकीस्वार कांबळे दाम्पत्याला धडक दिली. ट्रकच्या चाकाखाली सापडल्याने वैशाली यांचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीस्वार विजय गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. अधिक तपास उपनिरीक्षक नितिन शिंदे हे करत आहेत.