फोटो सौजन्य: iStock
दीपक गायकवाड/मोखाडा: पालघर जिल्ह्यात एकीकडे राजकीय वातावरण तापताना दिसत आहे.महायुतीतील प्रमुख घटक पक्ष एकमेकांचे कार्यकर्ते आणि प्रतिनिधी फोडताना दिसत आहेत.तर आता अचानक पणे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची मोखाडा तालुका कार्यकारिणी बरखास्त केली असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार सुनील भुसारा यांनी माध्यमांना दिली आहे.त्यामुळे येणारी निवडणुक डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट भाकरी फिरवणार का..? या प्रश्नार्थक चर्चांना उधान आले आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर कार्यकारिणी बरखास्त करून नवीन चेहरे पुढे करत नेमणूक होणार का.? असाही सवाल या ठिकाणी उपस्थित होत आहे.तथापी भुसारांच्या या अनाकलनीय निर्णयामुळे सध्यातरी तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून व-हांडा बैठकांच्या चर्चेला आयताच विषय मिळाला आहे.तसेच महायुती बरोबरच आता महाविकास आघाडीच्या बैठकांना आणि राजकीय घडामोडींना सुद्धा गती निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
राज ठाकरेंचा मोठा निर्णय; ‘या’ बड्या नेत्यांची मनसेतून हकालपट्टी
माजी आमदार सुनील भुसारा यांची सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाली आहे.त्यामूळे मोखाडा तालुक्याच्या पाठोपाठ पालघर जिल्ह्याचीही जिल्हा कार्यकारिणी सुद्धा नवीन होईल की काय याबाबतही राजकीय गोटातून नानाविध तर्कवितर्क होत असल्याचे बोलले जात आहे.
काल अचानक पणे भुसारा यांनी मोखाडा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कार्यकारिणी बरखास्त करत असल्याचे जाहीर केले आहे.त्यामुळे आता कार्यकारणी बरखास्त झाल्यामुळे तालुका कार्यकारणी मध्ये असलेले तालुकाध्यक्ष, शहर अध्यक्ष ,ओबीसी सेल, युवक अध्यक्ष, विद्यार्थी अध्यक्ष आदी संपूर्ण कार्यकारणीच रद्द झाल्याचे सांगण्यात आले असून गणेश चतुर्थीच्या शुभ पर्वाचे औचित्य साधत नवीन कार्यकारिणीचा श्री गणेशा करणार असल्याची माहिती सुद्धा यावेळी भुसारा यांनी दिली आहे.
अवघ्या काही महिन्यांवर पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपरिषदांच्या निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत.अशा मोक्याच्या वेळी संपूर्ण जिल्ह्यात पळवा पळवी चे वातावरण आहे.अशा रणधुमाळीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट हा सुद्धा महाविकास आघाडीमध्ये मोठ्या ताकतीने लढण्यासाठी सज्ज आहे.मात्र अनेक कार्यकारणी सदस्य जुने आहेत.त्यामूळे नवीन चेहऱ्यांना संधी देणे, काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना पक्षाचे पद देण्याचे उद्दिष्ट असून या माध्यमातून पक्षाला बळकटी देण्यासाठी नवीन कार्यकारणी आवश्यक असल्याचे सांगत भुसारा यांनी एक प्रकारे पक्ष ढवळून काढणार असल्याचे सुतोवाच केले आहे.त्यामुळे आता कोणते नवीन चेहरे आणि कोणते पदाधिकारी पक्षात नव्या दमाने सक्रिय होऊन काम करणार आहेत.हे लवकरच दिसून येणार आहे.