Maharashtra News: मिरा-भाईंदरमध्ये मनसेची बॅनरबाजी; मराठी भाषेसाठी आक्रमक भूमिका
भाईंदर / विजय काते: महाराष्ट्रात मराठी भाषेच्या संवर्धनासाठी मोठे पाऊल उचलण्यात आले असून, राज्य सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानंतर सर्व सरकारी, निमशासकीय आणि महापालिका कार्यालयांमध्ये मराठी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय जाहीर करताना स्पष्ट केले की, महाराष्ट्रातील प्रत्येक सरकारी कार्यालयाच्या दर्शनी भागात “मराठीत बोलणे अनिवार्य” असे फलक लावणे बंधनकारक असेल. तसेच, कार्यालयांमध्ये मराठीत संवाद साधण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर कठोर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल.
मनसेचे आक्रमक बॅनर – “मराठीतच बोलायचं, नाहीतर आम्ही आहोतच!”
या निर्णयाचे संपूर्ण महाराष्ट्रात स्वागत होत आहे. विशेषतः, मराठी भाषेसाठी लढा देणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) या निर्णयावर आनंद व्यक्त करत आक्रमक भूमिका घेतली आहे. या बॅनरद्वारे नागरिकांना आणि अधिकाऱ्यांना इशारा देण्यात आला आहे की, “संपूर्ण महाराष्ट्रात मराठी अनिवार्य” करण्याच्या मागणीला यश मिळाले आहे.यासोबतच, या बॅनरवर “मराठीतच बोलायचं, नाहीतर आम्ही आहोतच!” असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. हे बॅनर पाहता नागरिकांमध्ये उत्सुकता आणि चर्चा रंगली आहे. महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये हा निर्णय तात्काळ लागू व्हावा यासाठी मनसे आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे.
राज ठाकरेंच्या नेतृत्वाखालील संघर्षाला यश
मराठी भाषेच्या संवर्धनासाठी गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लढा दिला आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली विविध आंदोलनं झाली. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकसह महाराष्ट्रभर मनसेने “मराठी भाषेला अभिजात दर्जा द्या”, “मराठी भाषा अनिवार्य करा” आणि “मराठीला न्याय मिळाला पाहिजे” अशा मागण्यांसाठी आंदोलनं केली.मनसेच्या आंदोलनांमध्ये अनेकदा बड्या हॉटेल्स, मल्टिप्लेक्स, दुकाने आणि सरकारी कार्यालयांमध्ये मराठीत बोलण्याचा आग्रह धरला गेला. काही ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांनी मराठीत संवाद न करणाऱ्या व्यक्तींना जाब विचारल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. या सर्व संघर्षाला अखेर यश मिळाले असून, महाराष्ट्र सरकारने मराठी भाषा सरकारी कार्यालयांमध्ये अनिवार्य केली आहे.
सरकारी कार्यालयांमध्ये मराठीचा प्रभाव वाढणार
या निर्णयामुळे महाराष्ट्रातील सरकारी कार्यालयांमध्ये मराठी भाषा अधिक प्रभावीपणे रुजेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत अनेक सरकारी आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये हिंदी किंवा इंग्रजी भाषेचा वापर अधिक प्रमाणात केला जात होता. त्यामुळे मराठी भाषक नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत होते.
‘या’ निर्णयामुळे सरकारी कार्यालयांमध्ये मराठी भाषा अनिवार्य होणार
मराठी भाषेच्या भविष्याबाबत सकारात्मक संकेत
मराठी भाषेच्या संवर्धनासाठी उचललेले हे पाऊल महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांसाठी मोठे यश मानले जात आहे. सरकारी कार्यालयांव्यतिरिक्त खासगी कंपन्या, हॉटेल्स आणि अन्य व्यवसायांमध्ये देखील मराठी भाषा अनिवार्य करण्याची मागणी आता वाढू शकते.या निर्णयामुळे मराठी भाषेचा सन्मान राखला जाईल आणि मराठी भाषिकांना आपली भाषा अधिक आत्मविश्वासाने वापरण्यास संधी मिळेल. महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये नागरिक, साहित्यिक आणि अभ्यासकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.महाराष्ट्र सरकारचा हा निर्णय ऐतिहासिक ठरत असून, सरकारी कार्यालयांमध्ये मराठी भाषेचा वापर अधिकृतरित्या अनिवार्य होणार आहे. मनसेने या निर्णयाचे स्वागत करत आक्रमक पवित्रा घेतला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात हा निर्णय प्रभावीपणे लागू होईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.