
पालघरला वादळी पावसाचा मोठा फटका! ( सौजन्य - सोशल मीडिया )
घरांवरील छतांचे पत्रे उडाल्याने नागरिकांचे नुकसान झाले असून काही ठिकाणी घरालगतची झाडे कोसळल्याने घरांचे नुकसान झाले. विक्रमगड तालुक्यातील नाळशेत, शीलशेत, केव, म्हसरोळी आणि बोरांडा परिसरातही वादळी वाऱ्याने मोठी हानी झाल्याची माहिती आहे. वादळामुळे अनेक ठिकाणी झाडे रस्त्यावर कोसळल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. त्याचबरोबर वीज वितरण यंत्रणेलाही मोठा फटका बसला. वीज वाहिन्यांसह काही खांब जमीनदोस्त झाल्याने विविध गावांतील वीजपुरवठा खंडित झाला.
महावितरणच्या पथकांकडून कोसळलेले खांब उभारणे आणि वीजवाहिन्यांची दुरुस्ती करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. तर नुकसानीचा प्राथमिक आढावा घेण्यासाठी महसूल विभागाने गावपातळीवर पंचनाम्याची प्रक्रिया सुरू केली आहे. प्रत्यक्ष नुकसानीची माहिती संकलित झाल्यानंतर बाधित नागरिकांना मदतीबाबत पुढील कार्यवाही केली जाणार आहे.
दरम्यान, काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने भात पिकाच्या दाणे भरणीच्या अवस्थेत असलेल्या शेतक-यांची चिता वाढली होती. पिकांसाठी पावसाची गरज असताना बुधवारी रात्री झालेल्या पावसाने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र त्याच पावसासोबत आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे ग्रामीण भागातील घरांचे आणि वीज यंत्रणेचे मोठे नुकसान झाल्याने नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत.
बुधवारी सायंकाळी झालेल्या अचानक वादळी वाऱ्यामुळे म्हसरोली परिसरातही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने अनेक घरांवरील पत्रे उडून गेले असून काही घरांच्या भिंती कोसळल्या तर घरावर झाले पडल्याने नुकसान झाले आहे या नैसर्गिक आपत्तीत प्रामुख्याने गरीब आदिवासी कुटुंबांच्या घरांचे मोठे नुकसान झाले असून संसारोपयोगी साहित्याचेही नुकसान झाले आहे. अनेक कुटुंबे उघड्यावर आली आहेत. नुकसानग्रस्त कुटुंबांना तात्काळ मदत मिळावी यासाठी तहसीलदार, विक्रमगड आणि तहसील र्यालयाने तात्काळ म्हसरोली गावात येऊन नुकसानीचा पंचनामा करून शासनाकडे अहवाल सादर करावा व नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी म्हसरोली येथील ग्रामस्थ व पीडित कुटुंबीयांकडून होत आहे.