
Flowers showered on workers in Panchgani
पाचगणीत सफाई कर्मचाऱ्यांवर पुष्पवृष्टी
स्वच्छ सर्वेक्षणात देशात दुसरा क्रमांक
शहर स्वच्छ ठेवणाऱ्या हातांचा सन्मान
Panchgani/सचिन ननावरे: ज्या हातांनी पाचगणीचे रस्ते रोज स्वच्छ केले, त्या हातांवर आज फुलांचा वर्षाव झाला. केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२५–२६’मध्ये पाचगणीने २० हजारांपेक्षा कमी लोकसंख्येच्या शहरांच्या गटात देशात दुसरा क्रमांक पटकावला. या यशाचा विजयोत्सव साजरा करताना नगरपरिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यालयासमोर सफाई कर्मचाऱ्यांवर पुष्पवृष्टी केली. आपल्या दैनंदिन श्रमांची अशी दखल घेतल्याने भारावलेल्या कर्मचाऱ्यांनी ‘आम्ही केलेल्या कष्टांचे चीज झाले,’ अशी भावना व्यक्त केली.
विजयोत्सवानिमित्त नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी आणि स्वच्छतादूतांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. ‘पाचगणीनगरीचा विजय असो’ या घोषणांनी चौक दणाणून गेला. फटाक्यांच्या आतषबाजीत उपस्थितांनी राष्ट्रीय यशाचा आनंद साजरा केला.
नगरपरिषद कार्यालयासमोर सफाई कर्मचारी, स्वच्छता ठेकेदार आणि स्वच्छाग्रहींचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. पर्यटन हंगामात वर्दळ वाढली तरी रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवणे, घरोघरी जाऊन कचरा गोळा करणे आणि तो वेगवेगळा संकलित करणे, ही कामे कर्मचारी सातत्याने करतात. त्यांच्या या रोजच्या श्रमांमुळे पाचगणीला राष्ट्रीय पातळीवर मिळालेला मान अधोरेखित करत पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी नगराध्यक्ष दिलीप बगाडे, घाटजाई शहर विकास आघाडीचे अध्यक्ष तथा नगरसेवक शेखर कासुर्डे, उपनगराध्यक्षा माधुरी कासुर्डे, आरोग्य सभापती राजश्री सणस यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते.
पुण्याच्या स्वच्छतेसाठी प्रशासन ‘अॅक्टिव्ह मोड’वर; सफाईत हलगर्जीपणा केल्यास दहापट दंड
नवी दिल्लीतील विज्ञान भवनात ११ नोव्हेंबर रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पाचगणी गिरिस्थान नगरपरिषदेचा गौरव करण्यात आला. नगराध्यक्ष दिलीप बगाडे, नगरसेवक शेखर कासुर्डे व गणेश कासुर्डे आणि शहर समन्वयक ओंकार ढोले यांनी पुरस्कार स्वीकारला. मुख्याधिकारी पंडित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषदेने स्वच्छतेच्या कामांचे नियोजन केले. सफाई कर्मचारी, स्वच्छता ठेकेदार, स्वच्छाग्रही आणि पालिका कर्मचाऱ्यांच्या मेहनतीला नागरिक व व्यावसायिकांच्या सहभागाची जोड मिळाली.
नगरपरिषदेच्या माहितीनुसार, पाचगणीत ओला, सुका, प्लास्टिक, ई-कचरा आणि सॅनिटरी कचरा यांचे घरोघरी शंभर टक्के वर्गीकरण व संकलन केले जाते. नागरिकांनी वेगळा दिलेला कचरा सफाई कर्मचारी स्वतंत्रपणे संकलित करतात. स्थानिक नागरिक आणि व्यावसायिक ओल्या कचऱ्यापासून जागेवरच खत तयार करतात. घराघरांत पाळली जाणारी ही शिस्त आणि ती संकलनापर्यंत टिकवणाऱ्या कर्मचाऱ्यांचे सातत्य या बळावर पाचगणीने राष्ट्रीय यश मिळवले.
पाचगणी शहराच्या स्वच्छतेसाठी रात्रंदिवस झटणाऱ्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात घेऊन सन्मानित करण्याऐवजी आम्ही त्यांच्यावर पुष्पवर्षाव करून त्याच्या कामाची पोहोचपावती त्यांना देण्याचा प्रयत्न केला.त्यांच्या अथक प्रयत्नामुळेच पाचगणीच्या स्वच्छेतेची मोहोर देशपातळीवर पोहचली आहे.आम्हाला आमच्या कर्मचाऱ्यांचा रास्त अभिमान आहे.राजश्री सणस,आरोग्य सभापती.
जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ आणि शैक्षणिक केंद्र असलेल्या पाचगणीत ‘फ्लोटिंग पॉप्युलेशन’ मुळे शहरात स्वच्छता राखणे आव्हानात्मक काम होते.आमच्या कर्मचाऱ्यांनी मात्र त्यावर मात करून पाचगणी शहरातील स्वच्छतेत सातत्य राखले आहे.या कर्मचाऱ्यांमुळे पाचगणीची ‘स्वच्छ शहर’ अशी ओळख अधोरेखित झाली आहे.यापुढेही हातात हात घालून पाचगणी स्वच्छ ठेवण्यासाठी कटिबद्ध राहू.
– दिलीप बगाडे,
नगराध्यक्ष, पाचगणी.
Ans: स्वच्छ सर्वेक्षण २०२५–२६ मध्ये पाचगणीने देशात दुसरा क्रमांक पटकावला.
Ans: पाचगणी नगरपरिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी नगरपरिषद कार्यालयासमोर सफाई कर्मचाऱ्यांवर पुष्पवृष्टी करून त्यांचा गौरव केला.