
Maharashtra Politics: "हे सर्वसामान्यांचे नेतृत्व, भ्रष्टाचाऱ्यांना..."; श्रीकांत शिंदेंचा विरोधकांवर घणाघात
शिवसेनेला संधी देण्याचे खासदारांचे आवाहन
डॉ. श्रीकांत शिंदे यांची पाथरीत विरोधकांवर टीका
शिवसेनेने जाती-धर्माचे राजकारण कधी केले नाही- श्रीकांत शिंदे
पाथरी/परभणी: हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही जाती धर्माचे राजकारण केले नाही. तोच विचार घेऊन एकनाथ शिंदे साहेब पुढे जात आहेत. अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना शिंदे साहेबांनी जाती धर्मात भेदभाव केला नाही. त्यांनी सर्वच जाती धर्मांसाठी मोठे निर्णय घेतले. पाथरीत धर्माचे राजकारण करणाऱ्यांना येत्या निवडणुकीत थारा देऊ नका व नगर परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकवा, असे आवाहन शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आज येथील मतदारांना केले. पाथरी नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. या सभेला शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट, अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष सईद खान आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
शिवसेनेचे नगरध्यक्षपदाचे उमेदवार आसेफ खान निवडणुकीच्या रिंगणात आहेत. खासदार डॉ. शिंदे म्हणाले की, पाथरीसाठी ९१ कोटींचा विकास निधी दिला असून त्यातील ५० कोटी निधी वर्ग करण्यात आला. येथील २७०० घरे नियमानुकूल करण्याचा निर्णय घेण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी १ कोटी, वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून पाथरीत ३० कोटी, राष्ट्रीय महामार्गाला मंजुरी दिली, असे ते म्हणाले. आसेफ खान आणि सईद खान हे समीकरण आहे. या दोघांशिवाय पाथरीचा विकास होऊ शकत नाही, असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले. पाथरीत ३०० खाटांच्या रुग्णालयासाठी शिवसेनेचे अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष सईद खान यांनी स्वत:ची ५ एकर जागा दिली, असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले.
“मतदारांना दम दिला जात असेल, तर…”; निवडणुकीआधी श्रीकांत शिंदेंचा विरोधकांना थेट इशारा
ही निवडणूक सर्वसामान्यांची निवडणूक आहे. एकनाथ शिंदे हे सर्वसामान्यांचे नेतृत्व आहे, त्यांनी अडीच वर्षांत मुख्यमंत्री असताना सर्वसामान्यांसाठी कल्याणाकारी योजना आणल्या, असे ते म्हणाले. लाडकी बहिण योजना, एसटीमध्ये महिलांना सवलत, मुलींसाठी मोफत उच्च शिक्षण, शेतकऱ्यांसाठी मदत, लाडके भाऊ, अशा अनेक योजना राज्यात राबवण्यात आल्या. आता पाथरीत २०० मुलींसाठी वसतिगृह उभारण्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी आश्वासन नाही तर वचन दिले आहे, असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले.
खासदार डॉ. शिंदे म्हणाले की. पाथरीमध्ये पाणी पुरवठा योजनेसाठी १०० कोटी, भुयारी गटार योजनेसाठी ९० कोटी, रस्त्यांसाठी १५० कोटींचे प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत. हे प्रस्ताव नगर विकास खात्याकडून मंजुर करण्याची आपली जबाबदारी असून ती पूर्ण करणार, असे आश्वासन खासदार डॉ. शिंदे यांनी यावेळी दिले. जो काम करेल त्याच्या मागे शिवसेना पूर्ण ताकदीनं उभी राहते, असे ते म्हणाले. भ्रष्टाचाऱ्यांना घरी बसवा आणि काम करणाऱ्यांना संधी द्या, असे आवाहन खासदार डॉ. शिंदे यांनी मतदारांना केले.
मानवत-परळी रेल्वे मार्गाचा प्रश्न सोडवू
मानवत नगर परिषदेसाठी शिवसेना भाजप महायुतीच्या प्रचार सभेत बोलताना मानवत रोड ते परळी रेल्वेसाठी केंद्रात पाठपुरावा करु, असे आश्वासन खासदार डॉ. शिंदे यांनी दिले. ते पुढे म्हणाले, मानवतमध्ये विकास कामांसाठी ३० कोटींचा निधी दिला. मानवत नगर परिषदेसाठी शिवसेना भाजप युतीकडून अंजली कोक्कर नगराध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महायुतीने आयोजित केलेल्या प्रचार सभेत खासदार डॉ. शिंदे म्हणाले की मानवतमध्ये युतीने उच्च शिक्षित उमेदवार दिला आहे. मानवतमधील पाणी प्रश्न, बाह्यवळण रस्ता, आवास योजनेती प्रश्न मार्गी लावू, असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले.
Shrikant Shinde : ठाणे-मुंबई प्रमाणे नंदुबारचा चेहरा मोहरा बदलू, श्रीकांत शिंदे यांचे आश्वासन
मुस्लिम अल्पसंख्याक समाजासाठी ५५०० कोटी दिले
अल्पसंख्याक समजासाठीचा निधी ३० कोटींवरुन ७०० कोटींपर्यंत वाढवण्याचे काम एकनाथ शिंदे साहेबांनी केले. मुख्यमंत्री असताना अडीच वर्षात शिंदे साहेबांनी मुस्लिम अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी ५५०० कोटी दिला. हज यात्रेकरुंसाठी सुविधा, मुस्लिम समाजासाठी शैक्षणिक आणि आर्थिक विकासासाठी विविध कल्याणकारी योजना लागू केल्या असल्याचे खासदार डॉ. शिंदे म्हणाले.