अवकाळीत पाटण तालुक्यात ७४ घरे व १३१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान
पाटण : मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे पाटण तालुक्यात 74 घरांची पडझड झाली. तर 131.23 हेक्टर क्षेत्रावरील 1 हजार 128 बाधित शेतकऱ्यांच्या जमिनी व पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे कृषी विभागाकडून पूर्ण करण्यात आले असून, तालुक्यात सुमारे 36 लाख 97 हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती महसूल विभागाने दिली.
गेल्या महिन्यात २० ते २८ मे या कालावधीत अवकाळी पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. आठवडाभर संततधार पडलेल्या पावसामुळे घरांची पडझड झाली होती. तालुक्यात उन्हाळी भुईमूग, मका, ज्वारी, हायब्रीड, भाजीपाला व आंबा पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. सर्वाधिक उन्हाळी भुईमुगाचे नुकसान झाले होते. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अवकाळीने हिसकावून नेला. तालुक्यातील पाटणसह मल्हारपेठ, ढेबेवाडी, तारळे, कोयनानगर, मोरगिरी आदी सर्वच विभागात पिकांचे नुकसान झाले.
प्रांताधिकारी सोपान टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार अनंत गुरव यांनी संबंधित कृषी विभागसह महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार, अवकाळी पावसामुळे या नुकसान झालेल्या घटनास्थळी कृषी विभागाचे प्रशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष बांधावर भेट देऊन पंचनामा केला. या नुकसानीचा अहवाल नुकताच कृषी विभागाने तहसीलदार यांच्याकडे पाठविला आहे.
पाटण तालुक्यात 74 घरांची पडझड
अवकाळी पावसामुळे तालुक्यातील एकूण ७४ घरांची पडझड झाली असून ४ लाख ८१ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे तर तालुक्यातील १ हजार १२८ बाधित शेतकऱ्यांचे मिळून एकूण १३१.२३ हेक्टर क्षेत्रा-वरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यासाठी ३२ लाख १६ हजार १०८ एवढा निधी अपेक्षित आहे. तालुक्यातील घरे व शेतीच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून शासनाकडून तत्काळ भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी व नुकसानग्रस्तांनी केली आहे.