
अमरावती-पुणे विमानसेवेचा मार्ग मोकळा; आता इंदूर सेवेसाठी तीन कंपन्यांशी पत्रव्यवहार
अमरावती : अमरावतीकरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. अमरावती-पुणे विमानसेवेच्या आशा पुन्हा उंचावल्या आहेत. सुधारित ‘उडान’ योजनेत या हवाई मार्गाचा समावेश करण्यात आल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकात देण्यात आली आहे. राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी या सेवेसाठी सातत्याने पाठपुरावा केल्याचे सांगण्यात येत आहे.
बेलोरा दरम्यान, अमरावतीच्या विमानतळावरून इंदूरसाठीही विमानसेवा सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्याने पश्चिम विदर्भाच्या हवाई संपर्काबाबत अपेक्षा वाढल्या आहेत. थेट विमानसेवा सुरू झाल्यास शिक्षण, व्यापार, पर्यटन आणि उद्योगाला चालना मिळण्यासोबतच पश्चिम विदर्भाच्या विकासालाही नवी दिशा मिळू शकते.
पुणे प्रवास होणार अधिक सोयीचा
पुणे हे शिक्षण, माहिती तंत्रज्ञान, उद्योग आणि व्यापाराचे महत्त्वाचे केंद्र आहे. अमरावतीसह पश्चिम विदर्भातील विद्यार्थी, व्यावसायिक, उद्योजक आणि नोकरदारांना विविध कामांसाठी पुण्याला जावे लागते.
इंदूर सेवेसाठी तीन कंपन्यांशी पत्रव्यवहार
अमरावती-बेलोरा विमानतळावरून इंदूरसाठी विमानसेवा सुरू करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) पुढाकार घेतला आहे. कंपनीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी समाजमाध्यमाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, इंडिगो, स्टार एअर आणि फ्लाय ९१ या तीन विमान कंपन्यांशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मात्र, इंदूर विमानसेवा नेमकी कधी सुरू होणार, याची अधिकृत तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.
व्यापार, उद्योगासह उद्योजकांना मिळणार बळ
इंदूर हे मध्य भारतातील महत्त्वाचे व्यापारी केंद्र आहे. अमरावतीतील अनेक व्यापारी आणि उद्योजकांना इंदूरला ये-जा करावी लागते. सध्या रस्तेमार्गाचा वापर करावा लागतो, तर रेल्वेने प्रवास करताना मोठा फेरा पडतो. थेट विमानसेवा सुरू झाल्यास व्यापारी, उद्योजक आणि पर्यटकांचा वेळ वाचण्यासोबतच दोन्ही शहरांतील आर्थिक संबंध अधिक दृढ होण्यास मदत होऊ शकते.
आता अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
सध्या बेलोरा विमानतळावरून मुंबई-अमरावती-मुंबई विमानसेवा आठवड्यातून चार दिवस सुरू आहे. पुणे, दिल्ली आणि इंदूरसाठीही नियमित विमानसेवा सुरू करण्याची प्रवाशांची मागणी आहे. अमरावती-पुणे मार्गाचा सुधारित ‘उडान’ योजनेत समावेश झाल्याची माहिती समोर आली असली, तरी प्रत्यक्ष सेवा सुरू होण्याची तारीख, विमान कंपनी, वेळापत्रक आणि तिकीटदर यांची अधिकृत घोषणा अद्याप अपेक्षित आहे. त्यामुळे हवाई संपर्क विस्ताराच्या पुढील निर्णयांकडे अमरावतीकरांचे लक्ष लागले आहे.