Photos video prohibited in Ganpati immersion pune news
Ganapati visarjan Photos Prohibited : पुणे : पुण्यातील गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणूक अत्यंत लोकप्रिय आहे. फक्त राज्यातून नाही तर संपूर्ण देशातून गणेश भाविक हे पारंपरिक सोहळा पाहण्यासाठी येत असतात. पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये परदेशी पाहुणे देखील सहभागी होत असतात. विसर्जन मिरवणूक शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी आणि वेळेत पूर्ण होण्यासाठी पुणे पोलिसांकडून नियोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर कृत्रिम हौदामध्ये मूर्ती विसर्जित करण्यात येणार असून यावेळी फोटो आणि व्हिडिओ काढण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
गणपती बाप्पाचे कृत्रिम हौदामध्ये विसर्जन केले जाते. मात्र विसर्जनानंतर अनेकदा अर्धवट विसर्जित मुर्त्यांचे फोटो व्हायरल केले जातात. यावर आता बंदी घालण्यात आली आहे. याबाबत पुणे पोलिसांकडून सूचना जारी करण्यात आली आहे. गणेश विसर्जनानंतर कृत्रिम तलाव, हौद, नैसर्गिक तलाव, नदी, कॅनॉल आदी जलस्त्रोतामधील तरंगत्या किंवा अर्धवट तरंगत्या तसेच संकलित केलेल्या मुर्त्यांचे छायाचित्रण करून धार्मिक भावना दुखावतील व सार्वजनिक शांतता भंग पावेल अशी छायाचित्रे अथवा चलचित्रे समाजमाध्यमांवर प्रकाशित किंवा प्रसारित करण्यास मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये हा मनाई आदेश पोलीस उपआयुक्त, विशेष शाखा, पुणे शहर व कार्यकारी दंडाधिकारी डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी काढला आहे. विसर्जनानंतर गणेश मुर्तींचे छायाचित्रण, त्यांचे प्रकाशन व प्रसारण यावर बंदी घालण्यात आली असून आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२३ अन्वये दंडनीय कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद केले आहे.
हा आदेश दिनांक ०४ सप्टेंबर २०२५ रोजी ००.०१ वाजल्यापासून ते दिनांक १५ सप्टेंबर २०२५ रोजी २४.०० वाजेपर्यंत पुणे शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रामध्ये अंमलात राहील. सदर आदेश सार्वजनिक ठिकाणी प्रसिध्द करण्यात येत असून स्थानिक वृत्तपत्रांद्वारेही प्रसारित करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुणे पोलिसांची विसर्जन मिरवणुकीसाठी जोरदार तयारी
यंदा प्रथमच मंडळांचे जिओ मॅपिंग केले असून, प्रत्येक मंडळासोबत एक नोडल अधिकारी देण्यात आला आहे. त्यामुळे मिरवणूक वेळेत पुर्ण होईल, असे मानले जात आहे. पुणे पोलिसांनी प्रथमच मंडळांचे जिओ मॅपिंग केले आहे. विसर्जन मिरवणूकीत कुमठेकर, लक्ष्मी रस्ता, केळकर रस्ता व टिळक रस्त्यावरील प्रत्येक मंडळासोबत एक नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. हे नोडल अधिकारी दोन मंडळात अंतर पडू देणार नाहीत. तसेच, त्यांच्याशी समन्वय राखणार आहेत. जिओ मॅपिंगमुळे बसल्या ठिकाणी पोलिसांना नेमके मंडळ कोणत्या ठिकाणी आहे, ते का थांबले आहे, याची माहिती मिळणार आहे.