पिंपरी : राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पिंपरी-चिंचवड एसटी आगाराला कोकणातील जादा बस फेरीमुळे भरघोस उत्पन्न मिळाले आहे. गेल्या तीन दिवसांत सुमारे सात लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. तसेच, परतीच्या प्रवासातून देखील आणखी काही उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. तसेच जादा बसची सुविधा दिल्यामुळे चाकरमान्यांची देखील गावी जाण्याची गैरसोय टळली आहे.
औद्योगिक शहर असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात उद्योग व्यवसाय आणि शिक्षणासाठी संपूर्ण देशभरातील नागरिक वास्तव्य करीत आहेत. तसेच लाखोंच्या संख्येने कोकणवासीय देखील शहरात स्थायिक झाले आहेत. कोकणात गणेशोत्सव हा सर्वात महत्त्वाचा मानला जाणारा सण असल्याने या काळात संपूर्ण कुटुंबासह कोकण बांधवांची पावले कोकणाकडे वळतात. या हंगामाच्या काळात खासगी वाहतूकदार आपल्या दरात तिप्पट वाढ करतात. त्यामुळे प्रवाशांची लूट होऊ नये, यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाद्वारे जादा बस सोडण्यात आल्या. पिंपरी-चिंचवड आगार तसेच इतर आगारातील जादा बस मिळून एकूण १२८ बसगाड्या वल्लभनगर येथून रवाना झाल्या. यामधील पिंपरी-चिंचवड आगाराच्या एकूण ५५ एसटी २३ हजार ८३ किलोमीटर अंतर धावल्या. याद्वारे सहा लाख ९६ हजार २२० रुपये उत्पन्न आगाराला मिळाले आहे.
दरम्यान, बुधवारपासून अनंत चतुर्थीनंतर परतीचा प्रवास सुरू होणार आहे. त्यासाठी अतिरिक्त बसगाड्या ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे त्याद्वारे आणखीन काही उत्पन्न मिळू शकेल. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव एसटी प्रशासनासाठी लाभदायक ठरणार आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील भाविकांना गणेशोत्सवासाठी अतिरिक्त बसगाड्या सोडल्या होत्या. त्यांच्या मागणीनुसार आणखी काही बसगाड्या सोडण्यात येतील. नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्यात येत आहे.
– वैशाली कांबळे, स्थानक प्रमुख, पिंपरी चिंचवड आगार