Pune Politics: पुणे महापालिकेत रस्ते आणि वाहतूक कोंडीवरून राडा; 'PMPML' भ्रष्टाचारावरून काँग्रेस आक्रमक
शहरातील वाहतूक कोंडी आणि अपुऱ्या रस्ते जाळ्याचा मुद्दा सर्वाधिक गाजला. नगरसेवक हरिदास चरवड यांनी नवले पूल परिसरातील वारंवार होणाऱ्या अपघातांकडे लक्ष वेधत, आणखी किती बळी गेल्यावर प्रशासन जागे होणार? असा सवाल उपस्थित केला. सुहास टिंगरे यांनी लोहगाव-धानोरी रस्त्यावरील कोंडीमुळे नागरिकांना दोन-दोन तास अडकून पडावे लागत असल्याचे सांगितले. निवृत्ती बांदल यांनीही प्रशासनावर टीका केली.
डीपी रस्ते आणि टीडीआर प्रक्रियेवरूनही सदस्य आक्रमक झाले. प्रशांत जगताप, नीलेश निकम आणि स्वप्निल दुधाने यांनी टीडीआर प्रक्रिया अत्यंत किचकट आणि वेळखाऊ असल्याचा आरोप केला.
चार-चार वर्षे टीडीआरसाठी हेलपाटे मारावे लागतात, मग नागरिक रस्त्यासाठी जमीन का देतील? असा सवाल त्यांनी केला.
टीडीआर प्रक्रिया ऑनलाइन करण्याची मागणीही राजाभाऊ बराटे यांनी केली.
सचिन दोडके यांनी प्रशासनातील समन्वयाच्या अभावामुळे डीपी रस्ते रखडल्याचा आरोप करत अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली.
सायली वांजळे यांनी स्थळ पाहणी न करता डीपी आराखडे तयार केले जात असल्याने प्रत्यक्षात अंमलबजावणी अडखळत असल्याचे नमूद केले.
प्रिया गदादे यांनी जनता वसाहतीतील एकाच रस्त्यावरचा वाढता ताण लक्षात घेऊन पर्यायी मार्गाची गरज अधोरेखित केली.
काका चव्हाण, अनिता इंगळे, गौरव घुले, अतूल तरवडे, अरुण राजवाडे, प्रतिभा चोरघे, धनश्री कोल्हे आदीनी त्यांच्या भागातील रस्त्यांच्या विकास कामासंदर्भातील प्रश्न मांडले, यासंदर्भात शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी खुलासा केला. ते म्हणाले, शहरात सध्या केवळ ९ टक्के रस्ते उपलब्ध असून, ते १५ टक्क्यापर्यंत वाढविणे गरजेचे आहे. दररोज १२०० ते १३०० वाहनांची भर पडत असल्याने रस्ते विकासावर भर देणे अपरिहार्य बनले आहे.
UPI Payment Complaint Number: चुकीच्या क्रमांकावर झाले UPI payment? घाबरू नका,
टीडीआर प्रक्रिया ९० दिवसांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून आवश्यक कागदपत्रे पूर्ण असल्यास विलंब होणार नाही,असे पावसकर यांनी स्पष्ट केले, लोहगाव धानोरी रस्ता सीएसआरच्या माध्यमातून विकसित करण्याचा प्रस्ताव असून, पुणे-नगर रस्त्यावरील कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक विभागासोबत समन्वय सुरू असल्याचेही त्यानी सांगितले.
शिवणे-खराडी रस्त्यास प्राधान्य दिले असून, जागा संपादन प्रक्रियेला गती देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जागा ताब्यात घेण्यात नागरिकांकडून कागदपत्रांचा विलंब, मोबदल्यावरील वाद आणि टीडीआर प्रक्रियेत उशीर ही अडचणी मान्य केल्या आहेत. टीडीआर प्रक्रिया ९० दिवसांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले, काही भागांमध्ये अतिक्रमण आणि वन, पाटबंधारे परवानग्या न मिळाल्याने कामे ठप्प आहेत.
महत्त्वाचे मुद्दे
शहरात केवळ ९ टक्के रस्ते
१५ टक्क्यांपर्यंत वाढवणे आवश्यक
दररोज १२०० वाहनांची पडते भर
शहरात मिसिंग लिंक
फक्त १२ मिसिंगा लिंकवर काम सुरू
नव्या वर्षात आणखी १२ मिसिंग लिंकवर काम






