मदतीला धावले पोलीस अन् सापडला गुटखा
कन्नड : सोलापूर-धुळे या राष्ट्रीय महामार्गावर टापरगाव नजीक छत्रपती संभाजीनगरकडे कार चालली असता रस्त्यावरून खाली गेली. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत केली. मात्र, सदर कारमध्ये गुटखा आढळल्याने कारचालकाला आरोपी करून पोलीसांनी ७ लाख २५ हजार १०६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
टापरगाव शिवारात राष्ट्रीय राजमार्ग क्र ५२ वर समर्थ कॅफेच्या पुढे एक गाडी रोडच्या खाली गेली होती. धीरज चव्हाण, हर्षवर्धन काळे हे पोलिस कर्मचारी मदतीसाठी घटनास्थळी पोहचले. रोडच्या खाली गेलेली फियाट कार (क्रमांक एमएच- ०४ ईएफ ७२६९) मधील चालक अजिम तय्यद सय्यद (वय २१, रा. शंभुनगर शहानुरमिया दर्गा, छत्रपती संभाजीनगर) यास गाडी रोडच्या खाली कशी गेली व त्यास मार लागला तर नाही यासंबंधी विचारपूस केली. मार लागला नाही असे त्याने सांगितले. त्यानंतर पोलिसांनी दिनकर राशीनकर यांचा ट्रॅक्टर बोलावून ट्रॅक्टरच्या साहाय्याने सदर कार रोडवर काढली.
त्यानंतर कारचालक अजिम तय्यद सय्यद (रा. शंभुनगर शहानुरमिया दर्गा, छत्रपती संभाजीनगर) यास कारमध्ये काय आहे, अशी विचारपूस केली असता त्याने कारमध्ये असलेल्या गोण्याबाबत उडवाउडवीचे उत्तरे दिली. पोलीसांनी कारमधील गोण्या पाहिल्या असता त्यात विमल पान मसाला व राजनिवास गुटखा व तंबाखू असल्याचे दिसून आले.
दरम्यान, त्यास पुन्हा विचारपूस केली असता कारमध्ये असलेल्या गोण्यामध्ये गुटखा असल्याचे चालकाने सांगितले. सदर ठिकाणी दोन पंचासमक्ष जप्ती पंचनामा केला. त्यानंतर कार ग्रामीण पोलीस ठाण्यात आणण्यात आली.