राम करले, बाजारभोगाव : पन्हाळा तालुक्यातील पन्नास ग्रामपंचायत निवडणुक कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे गावा- गावात राजकारण तापू लागले आहे. ग्रामपंचायतीच्या राजकारणात पंचायत समिती, जिल्हा परिषद व विधानसभेची रंगीत तालीम होणार असल्याने राजकीय नेते अॅटिव्ह झाले आहेत. ग्रामपंचायतीवर आपल्या गटाची सत्ता येण्यासाठी वरिष्ठ पातळीवर मोर्चेबांधणी करण्यात येत आहेत. मतदान १८ डिसेंबरला होणार असल्याने ऐन हिवाळ्यात राजकीय हवा चांगलीच गरमा होणार आहे.
तालुक्यात राजकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण आणि प्रमुख नेत्यांच्या प्रतिष्ठेच्या असलेल्या गावातील ग्रामपंचायत निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत राजकीय घडामोडीना वेग आला आहे. सरपंचपदाचे पडलेले आरक्षण आणि इच्छुकांनी गुडघ्याला बांधिलेले बाशिंग यामुळे सरपंचपदाचा उमेदवार ठरवताना राजकीय निकष लावाले जाणार आहेत. जनतेतून थेट सरपंच असल्याने उमेदवारांची आर्थीक परिस्थिती, रणांगणात खेळण्याची प्रबळ इच्छा, विरोधी उमेदवार त्याची राजकीय ताकद आदी मुद्यांवर राजकीय खल सुरु आहे. भाजप व फडणवीस सरकारने थेट जनतेतून सरंपचाची िनवड करण्याचा निर्णय घेतल्याने काहींनी आपली तलवार म्यान केली आहे. त्यामुळे इच्छुकांच्या भाऊगर्दीत चांगला उमेदवार निवडताना नेते मंडळींची दमछाक होणार आहे.
सत्तेच्या काळात केलेल्या कामांचा लेखाजोखा मतदारांसमोर मांडण्यासाठी सत्ताधाऱ्यांची धडपड सुरू आहे. तर दिलेल्या आश्वासनाची पुर्तता झाली का ? मतदारांची अपेक्षा पूर्ण केल्या का, यांची चाचपणी जागृत मतदारांनी सुरु केली आहे. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात विरोधकांची सुरू केलेली मोर्चेबांधणी कितपत यशस्वी होणार ? हे ग्रामपंचायत निवडणूकच्या निकालानंतर कळणार आहे.
राजकीय घडामोडींना वेग
ग्रामपंचायत निवडणुकीमुळे पन्हाळा तालुक्याच्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राजकीय घडामोडीवर प्रमुख नेते लक्ष ठेवून आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते जोडण्या करण्यात मग्न झाले असले तरी मतदारांनी आपल्या मनात पक्का विचार करुन कोणाला संधी द्यायची, कोणाला आस्मान दाखवयचं याचा निर्धार केला आहे.
सरपंचपदाच्या उमेदवारावर बोजा
सरपंचपद थेट जनतेतून निवडून द्यायचा आहे. सरपंचांना जास्त अिधकार असल्याने सर्व निवडणुकीचा खर्च सरपंचपदाच्या उमेदवारांनी करावा असा पवित्रा काही ठिकाणी इच्छुक सदस्यांनी घेतला आहे. सदस्यपदाच्या उमेदवारांना आपल्या वाॅर्डापुरत्या मर्यादित जोडण्या कराव्या लागणार आहेत .
‘या’ गावात उडणार राजकीय धुरळा
आसगाव, परखदळे, गोठे, तांदुळवाडी, पणुत्रे, पणोरे, वेतवडे, आकुर्डे, मरळी, मोरेवाडी, सावर्डे तर्फ असंडोली, मल्हारपेठ, वाघुर्डे, घरपण, पडळ, यवलुज, कोतोली, कोलोली, माळवाडी, गोलीवडे, आळवे, पिंपळे, करंजफेण, घोटवडे, बहिरेवाडी, जाखले, काखे, माले, शहापूर, मिठारवाडी, पिपळे तर्फ सातवे, बोगेवाडी, आंबवडे, बादिवडे, पोर्ले तर्फ बोरगाव, मानवाड, पाटपन्हाळा, किसरुळ, कुंभारवाडी, साळवाडी, वाळोली, कसबा बोरगाव, चव्हाणवाडी, कोलिक, गिरोली, कुशिरे तर्फ ठाणे, पोहाळे तर्फ आळते, दरेवाडी, राक्षी, आसुर्ले या गावात राजकीय वातावरण तापू लागले आहे.
Web Title: Politics in panhala taluka heated up nrab