मराठवाड्यात पुढील चार दिवस बरसणार
पुणे : काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने जनजीवन विस्कळीत केले होते. अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी झाले होते. शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान या अवकाळी पावसामुळे झाले. पण या पावसाने काही दिवसांपासून उघडीप दिल्याचे दिसत आहे. असे असताना आता पावसाबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्रात यावर्षी सरासरीच्या 106 टक्के पावसाचा अंदाज आहे.
यंदाच्या मान्सूनमध्ये काही काळ पावसांत मोठे खंडही असतील. महाराष्ट्रात यावर्षी सरासरीच्या 106 टक्के पावसाचा अंदाज आहे. कमी दिवसांत अधिक पाऊस असा या पावसाचा पॅटर्न असेल, असा अंदाज ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केला आहे. कमाल तापमान, सकाळ व दुपारची सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा ताशी वेग आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी या निकषांवर आधारित हा अंदाज असून, वाऱ्याचा वेग, सूर्यप्रकाशाचा कालावधी कमी आढळल्याने जून, जुलै महिन्यांत धुळे, राहुरी, परभणी, निफाड, अकोला, पाडेगांव, कोल्हापूर येथे पावसात मोठे खंड राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, दापोली, नागपूर, सोलापूर, जळगाव, पुणे, धुळे व कराड येथे खंडाचा कालावधी कमी राहण्याची शक्यता आहे, असे डॉ. साबळे म्हणाले. गेल्या काही वर्षांमध्ये हवामानात वारंवार बदल होत आहेत. 2030 सालापर्यंत ती वाढतच जाणार आहे. त्यामुळे काही भागात पावसाचे प्रमाण वाढेल, तर काही भागात ते कमी होईल, असा अंदाज आहे.
कार्बन डायऑक्साईडची घनता वाढली
हवेतील कार्बन डायऑक्साईडची घनता ०.०३ वरून ०.०४ एवढी वाढली आहे. कार्बन डाय ऑक्साईड शोषून घेणारी वनसंपदाच नष्ट होत असल्याने हे संकट समोर उभे ठाकले आहे. त्यामुळे हे हवामान बदलाचे संकट टाळण्यासाठी जागतिक पातळीवरून प्रयत्न होणे गरजेचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पेरणी नेमकी करावी कधी?
शेतकरी पेरण्या करण्याच्या मागे लागतील. मात्र, आताच पेरण्या करू नयेत असा सल्ला हवामान विभाग आणि कृषी विभागाने दिला आहे. त्यासंदर्भात विचारले असता डॉ. साबळे म्हणाले की, ज्या जमिनी काळ्या आणि पाणी राखून ठेवण्याची क्षमता बाळगून आहेत, त्या ठिकाणी पेरणी करता येऊ शकेल, मात्र ज्या हलक्या जमिनी आहेत, तेथे पेरणी करू नये.