Poster of Walmik Karad supporters appealing for financial help goes viral on social media
Walmik Karad Poster : बीड : मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. त्याच्या हत्येला आता जवळपास एक वर्ष होत आले असून अजूनही देशमुख कुटुंबाला न्यायाची प्रतिक्षा आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला वाल्मिक कराड (Walmik Karad) सध्या जेलची हवा खात आहे. वाल्मिक कराड हा या हत्या प्रकरणातील मास्टर माईंड असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तो जेलमध्ये असताना देखील त्याचे कार्यकर्ते बाहेर त्याच्या समर्थनार्थ बाहेर प्रयत्न करत असल्याचे उघड झाले आहे. कराडच्या समर्थनासाठी स्कॅनर आणि बॅनर फिरत आहे. सोशल मीडियावर वाल्मिक कराडसाठी आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात येत आहे. यावरुन आता वाल्मिक कराड हा जेलमध्ये असून देखील त्याची वेगळ्या प्रकारे वसुली सुरु असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. वर्गणीच्या माध्यमातून तो पैसे घेत असल्याचा आरोप देखील केला जात आहे.
सोशल मीडियावर वाल्मिक कराडच्या समर्थनाचे पोस्टर तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये वाल्मिकला अर्थिक मदत करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. करोडो रुपयांची उलाढाल केल्याचा आरोप असलेल्या वाल्मिक कराडला अर्थिक मदतीची गरज असल्याचा हास्यस्पद दावा या पोस्टरमधून करण्यात आला. बीडमध्ये अनेकांकडून वसुलीची कामे करणाऱ्या सुटकेसाठी अर्थिक मदत करण्याचे आवाहन या पोस्टरमधून करण्यात आले आहे. यासाठी पोस्टरवर क्युआर कोड देखील देण्यात आला आहे. या क्युआर कोडवर स्कॅन केल्यावर संदीप तांदळे नामक व्यक्तीचे बॅंक अकाऊंट येत असल्याचे समोर आले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
वाल्मिक (आण्णा) कराड संघटना मित्र मंडळाकडून हे पोस्टर छापण्यात आले आहे. विशेष म्हणजे वाल्मिक कराडच्या अर्थिक मदतीच्या या पोस्टरवर मुंडे कुटुंबाचा देखील फोटो छापण्यात आला आहे. वाल्मिक कराडच्या या पोस्टरवर माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे यांचा फोटो छापण्यात आला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडसोबत असणाऱ्या निकटच्या संबंधांमुळे धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. धनंजय मुंडे यांच्यावर राज्यभरातून तीव्र टीका झाल्यानंतर त्यांना मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. या प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली. त्याचबरोबर दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा फोटो देखील या पोस्टरवर छापण्यात आला आहे. याचबरोबर भगवान बाबा आणि भगवान बाबा गडाचे महंत नामदेव महाराज शास्त्री यांचा देखील फोटो छापण्यात आला आहे. यावरुन आता पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला जेलमधून सोडवण्यासाठी वर्गणी मागितली जात आहे (फोटो – सोशल मीडिया)
फुल ना फुलाची पाकळी दान
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या पोस्टरवर वाल्मिक कराडचा मोठा फोटो छापण्यात आला आहे. वाल्मीक (अण्णा) कराड संघटना मित्र मंडळ मजबूत करण्यासाठी तसेच सोशल मीडियावर ‘वाल्मीक अण्णाचे नाव आणि चेहरा सातत्याने टिकून राहण्यासाठी आपले आर्थिक सहाय्य फार महत्त्वाचे आहे., फुल ना फुलाची पाकळी दान करून मदत करा तेव्हाच अण्णा आपल्यामध्ये एक दिवस येतील.. थोडीशी मदत.. आण्णासाठी, आपल्या स्वाभिमानासाठी’ अशा मजकुराचे हे बॅनर सोशल माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. याचबरोबर क्युआर कोडदेखील देण्यात आला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
धनंजय देशमुख यांची तीव्र नाराजी
या प्रकरणावर मृत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया देत नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले की, दसऱ्याच्या दिवशी तसेच गेल्या दोन दिवसांपासून आरोपीचा फोटो लावलेले बॅनर आणि स्कॅनर फिरत आहे. आरोपीचं कुठपर्यंत समर्थन करावं याचं उदाहरण बघताय आपण. जे लोकप्रतिनिधी आहेत ते सुरुवातीपासूनच या आरोपींचं समर्थन करत आलेले आहेत त्यावर काहीही बोलत नाहीत म्हणजेच सरळ-सरळ हा देखील एक समर्थनाचा भाग आहे. दरम्यान हे सगळं मी जिल्हाधिकारी आणि बीडच्या एसपींना पाठवलेलं आहे. या आरोपींवर काय कारवाई होणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. मात्र जोपर्यंत या लोकांवर कारवाई होणार नाही तोपर्यंत या आरोपींचं समर्थन हे असंच होत राहील, अशा शब्दांत धनंजय देशमुख यांनी नाराजी व्यक्त करत धनंजय मुंडेंवर अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.