गोंदिया : गोंदीया जिल्ह्यामधील अर्जुनी मोरगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका कोंबडीचोराला पोलिसांनी अटक केली असून या कोंबडीचोराला न्यायालयाने १५ दिवसांची पोलिस कोठडीची शिक्षा सुनावली आहे. अर्जुनी मोरगाव पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या महागाव येथील सूर्यकांत पिल्लेवान यांच्या पोल्ट्री फार्ममधून १५ ते १६ मे या कालावधीत रात्रीच्या सुमारास १५ गावठी कोंबड्या चोरीला गेल्या होत्या. याबाबतची तक्रार त्यांनी अर्जुनी मोरगाव पोलिसांत केली होती.
कोंबडीचोराला शोधण्यासाठी सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ कदम यांनी पथक तयार करून गुप्त माहिती काढली. या माहितीच्या आधारे संशयित आरोपी म्हणून पंकज काळसर्पे याला १७ मे रोजी ताब्यात घेतलं. त्याला विश्वासात घेऊन कोंबड्या चोरीबाबत विचारले असता, त्याने कोंबड्या चोरल्याची कबुली पोलिसांना दिली. तसंच चोरी केलेल्या कोंबड्या अर्जुनी मोरगाव येथील एका दुकानदारास पाच हजार रुपयांत विकल्याचंही कबूल केलं. त्यामुळे पोलिसांनी ही रक्कमदेखील जप्त केली आहे.
दरम्यान, सहायक पोलिस निरीक्षक कदम यांनी आरोपीविरुद्ध पुरावे गोळा करून १८ मे रोजी अर्जुनी मोरगाव येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालय येथे दोषारोपपत्र दाखल केलं आहे. न्यायालयाने सर्व पुराव्यांची पडताळणी करून कोंबडीचोर पंकज काळसर्पे याला १५ दिवसाच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
[read_also content=”खोट्या सह्या करून 20 सदनिकांची परस्पर विक्री https://www.navarashtra.com/maharashtra/mutual-sale-of-20-flats-with-false-signatures-nrdm-282115.html”]
तसेच उल्लेखनीय म्हणजे, गोंदिया जिल्ह्याच्या इतिहासात अल्प कालावधीत न्यायालयाने शिक्षा सुनावल्याची ही पहिलीच घटना आहे. तसंच या कोंबजीचोरास अटक करण्याची कारवाई पोलिस अधीक्षक विश्व पानसरे, प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी विजय भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली अर्जुनी मोरगावचे ठाणेदार चंद्रकांत सूर्यवंशी, सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ कदम, पोलिस अंमलदार दीपक खांडेकर, गाैरीशंकर कोरे प्रवीण बेहरे, लोकेश कोसरे, श्रीकांत मेश्राम, रमेश सेलोकर यांनी केली.