इंदापूर : समाजकारणात व पक्षात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांशी विचारविनिमय करून पुढील दिशा ठरवण्यासाठी बुधवारी (दि.२५) सकाळी अकरा वाजता शासकीय विश्रामगृह इंदापूर या ठिकाणी जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य व बांधकाम सभापती प्रवीण माने (Pravin Mane) यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) तालुकाध्यक्ष ॲड. तेजसिंह पाटील (Tejsingh Patil) यांनी दिली. यावेळी अमोल भिसे, किसन जावळे, राजाराम सागर आदी उपस्थित होते.
८३ वर्षांच्या योध्याच्या मागे संपूर्ण महाराष्ट्र उभा राहिल्याचे आपण पाहत आहोत. इंदापूर तालुक्यामध्ये आमच्यावर पक्ष बांधण्याकरिता जबाबदारी दिली आहे. येणाऱ्या काळामध्ये पक्षाचे एकनिष्ठेने काम करून पवार साहेबांचे हात बळकट करण्यासाठी निश्चित प्रयत्न करू, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित इंदापूर तालुका कार्याध्यक्ष महारुद्र पाटील यांनी सांगितले.
इंदापूर तालुका शरद पवार यांना मानणारा असल्यामुळे तालुक्यातील सर्वसामान्य जनता निश्चितच त्यांच्या मागे उभी राहील. पक्ष सोडून मी शिवसेनेत गेलो होतो. तरी मला पुन्हा पक्षात समाविष्ट करून कार्याध्यक्षपदाची जबाबदारी दिली. पवार परिवाराशी गेल्या ३५ वर्षांपासून संबंध असल्यामुळे त्यांच्यासोबत जायचे असा निर्णय घेतला. त्यांचा विश्वास सार्थ ठरविण्याचा नक्कीच प्रयत्न करेन, असे महारुद्र पाटील यांनी सांगितले.
तसेच बुधवारी २५ तारखेला शासकीय विश्रामगृह या ठिकाणी होणाऱ्या बैठकीला शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर निष्ठा असणाऱ्या सर्वांनी उपस्थित रहावे. या बैठकीतच तालुक्याच्या कार्यकारणी निवडीकरिता विचार विनिमय करणार असल्याचे त्यांनी सांगितले.