
President Vishwas Patil expressed his views at the akhil bhartiya marathi sahitya sammelan satara live news
Akhil Marathi Sahitya Sammelan : सातारा/तेजस भागवत: स्वराज्याची राजधानी असलेल्या सातारा जिल्ह्यात ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. साताऱ्यात आज साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले आहे. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील म्हणाले, “शिवेंद्रराजेसिंह भोसले यांच्याकडून माझा सन्मान व्हावा हा मी दुग्धशर्करा योग समजतो. तुमच्या समोर बोलत असणारा पाटील हा शब्दांच्या फडात रमणारा आहे. या जिल्ह्याने राज्याला ५ मुख्यमंत्री दिले. सातारा म्हणजे साहित्यरत्नांची खाण.”
पुढे बोलताना विश्वास पाटील म्हणाले, “सध्या काळ वेगळा आहे. निवणुकांचा काळ आहे. देवेंद्रजी तुमची निवडणुकीची आचारसंहिता असेल तर आमची विचारसंहिता आहे. शेतकरी आत्महत्या केवळ शासनाचे नव्हे तर साहित्यिकांचे देखील अपयश आहे. शेतकऱ्याना न्याय मिळाला पाहिजे. अण्णाभाऊ साठे याना भारतरत्न मिळाला पाहिजे. “
हे देखील वाचा : Marathi Sahitya Sammelan : अवघी सातारानगरी साहित्यमय! ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची भव्य ग्रंथदिंडी
“राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयात स्वस्त दरात ग्रंथालय/पुस्तकांची दुकाने सुरू करावीत. काहीही झाले तरी राज्यातील मराठी शाळा बंद पडता कामा नयेत. मुंबई ही मराठी माणसाचीच आहे, “ असे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील म्हणाले.
दरम्यान आज ज्येष्ठ लेखिका मृदुला गर्ग यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संमेलनाचे स्वागताध्यक्ष मंत्री शिवेंद्रराजेसिंह भोसले, कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष मिलिंद जोशी, दिल्ली येथे मागील वर्षीच्या संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर, आणि एनी ज्येष्ठ मंत्री आणि मान्यवर उपस्थित होते.
हे देखील वाचा : “जोपर्यंत देवेंद्र फडणवीस आहे तोवर…”; Akhil Bhartiya Sahitya संमेलनात मुख्यमंत्री स्पष्टच बोलले
साताऱ्यात आज साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी साहित्यरसिकांना संबोधित केले. ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “ साहित्याच्या महाकुंभात साहित्यिकांना प्रणाम. स्वराज्याच्या राजधानीत साहित्य संमेलन होत आहे याचा आनंद आहे. आपण सर्वजण साहित्याचे सेवेकरी आहोत. हा इतिहास, विचारांचा अनुभवाचा संगम आहे. हीच आपल्या संस्कृतीची ओळख.” असे फडणवीस म्हणाले आहेत.
पुढे ते म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून दिला. यासाठी आपण खूप संघर्ष केला. जोवर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहे तोवर कोणत्याही साहित्यिक संस्थेत हस्तक्षेप होणार नाही. आम्ही मराठीची सेवा करतच राहू. आपल्यालाच सगळे काही समजते या मूर्खांच्या नंदनवनात राहणारा मी नाही. महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, हे मी मुख्यमंत्री म्हणून सांगतो”, असे फडणवीस म्हणाले.