
मुंबई : महाराष्ट्राच्या संस्कृती व परंपरेचा भाग असलेला म्हणजे दहीहंडी. प्रो कबड्डीच्या (Pro-Govinda) धरतीवर आता प्रो-गोविंदा स्पर्धेचा थरार आजपासून दिसणार आहे. मुंबईतील वरळी येथे प्रो-गोविंदा स्पर्धेचा थरार पाहयला मिळणार आहे. दहीहंडी या पारंपरिक उत्सवाला साहसी खेळाचा दर्जा राज्य सरकारने दिला आहे. त्या पाठोपाठ आता गोविंदांना प्रोत्साहन देण्यासाठी यावर्षी पासून प्रो-गोविंदा दहीहंडी स्पर्धा सुरू करण्यात आली आहे. राज्य शासनातर्फे ही स्पर्धा होणार आहे. प्रो-गोविंदा दहीहंडी स्पर्धेचं हे पहिलेच वर्ष आहे. (Pro-Govinda tournament to be witnessed in Mumbai from today; How many lakhs will the winner get)
16 गोविंदा पथकं आणि 197 गोविंदांचा सहभाग
वरळी येथील एनएससीच्या डोममध्ये 31 ऑगस्टला ही स्पर्धा पार पडणार आहे. या स्पर्धेचा थरार सर्व मुंबईकरांना अनुभवता येणार आहे. यासाठी राज्यभरातील गोविंदा पथकांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात आले होते. 197 गोविंदांनी या गोविंदा स्पर्धेसाठी सहभाग नोंदवला आहे. प्राथमिक फेरीनंतर अंतिम फेरीत केवळ 16 गोविंदा पथकांना स्थान दिले जाणार आहे.
विजेत्याला अकरा लाखाचे बक्षीस
गोविंदा दहीहंडी स्पर्धेच्या विजेत्या पथकाला अकरा लाख रुपयांचे पहिले बक्षीस देण्यात येणार आहे. दुसऱ्या विजेत्याला सात लाख रुपयांचे बक्षीस तिसऱ्या विजेत्या दहीहंडी पथकाला पाच लाख रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. चौथे उत्तेजनार्थ बक्षीस तीन लाख रुपयांचे असणार आहे. एकूण 26 लाख रुपयांची बक्षिसे या स्पर्धेत देण्यात येणार आहेत. या प्रो गोविंदा दहीहंडी स्पर्धेसाठी राज्यभरातून आलेल्या गोविंदा पथकांना मोठ्या रकमेची बक्षीस देण्यात येणार आहेत.
गोविंदांसाठी विमा कवच…
या प्रो गोविंदा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या गोविंदांचा विमा काढण्यात येणार असून 50,000 गोविंदांचा दहा लाख रुपयांचा विमा काढण्यात येणार आहे. अपघाताने मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना दहा लाख रुपयांची मदत देण्यात येणार असल्याची माहिती शासनाने दिली आहे.