Puja at Vitthal Rukmini Temple in Pandharpur on the occasion of Maghi festival
पंढरपूर : माघी शुद्ध जया एकादशीनिमित्त मंदीर समितीच्या वतीने श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेची नित्यपूजा संपन्न झाली. श्री विठ्ठलाची नित्यपूजा मंदिर समितीचे सदस्य ह. भ. प. प्रकाश महाराज जवंजाळ तर रुक्मिणी मातेची नित्यपूजा मंदीर समितीचे सदस्य संभाजी शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक संपन्न झाली.
यावेळी आमदार तुकाराम काते, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, मंदिर समितीच्या सदस्या ॲड. माधवी निगडे, उपविभागीय पोलिस अधिकारी अर्जुन भोसले, पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके , शंकर पटवारी, व्यवस्थापक मनोज श्रोत्री उपस्थित होते माघी एकादशी निमित्त श्री.विठ्ठल-रक्मिणीच्या दर्शनासाठी सुमारे चार लाखांहून अधिक भाविक दाखल झाले आहेत. माघी एकादशी निमित्त मंदिरात विविध फुलांची सजावट करण्यात आली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
माघी एकादशीला राज्यातील विविध जिल्ह्यातून तसेच परराज्यातून सुमारे चार लाखांहून अधिक भाविक पंढरीत दाखल झाले आहेत. भाविकांना सुलभ दर्शन व्हावे यासाठी मंदिर समितीच्या वतीने आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यामध्ये समितीच्या वतीने दर्शनरांगेत व दर्शन मंडपात, स्वच्छ पिण्याचे पाणी, शौचालये, लाईव्ह दर्शन आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. कायमस्वरूपी व तात्पुरत्या स्वरूपात 128 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. दर्शनरांग दर्शनमंडप, मंदिर व मंदिर परिसर या ठिकाणची वेळोवेळी स्वच्छता करण्यात येत आहे. दर्शनासाठी येणा-या भाविकांसाठी मंदिर समितीच्या वतीने विमा काढण्यात आला आहे. श्री. संत ज्ञानेश्वर दर्शनमंडप येथे चौकशी कक्ष उभारण्यात आला आहे. त्यामध्ये मराठी, इंग्रजी, हिंदी, कन्नड व तेलगू भाषा अवगत असलेले कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून, भाविकांना ध्वनिक्षेपकाद्वारे वेळोवेळी सूचना देण्यात येत आहेत. दर्शनरांगेत मोफत खिचडी व चहा वाटप करण्यात येत आहे. चंद्रभागा वाळवंट व पत्राशेड येथे महिला भाविकांच्या सोईसाठी चेंजिंग रूम व दर्शनरांगेत हिरकणी कक्ष उभारण्यात आला असल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.
दिल्ली निवडणुकीचा निकाल अपडेट घ्या एका क्लिकवर
65 एकर, नदीपात्र, प्रदक्षिणामार्ग, मंदिर परिसर व शहरातील इतर ठिकाणी नगरपालिकेच्या वतीने वेळोवेळी स्वच्छता करण्यात येत आहे. पोलीस प्रशासन व मंदिर समितीच्या वतीने भाविकांच्या सुरक्षिततेसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. हरिनामाच्या जयघोषात आणि टाळ मृदुंगाच्या गजरात अवघी पंढरी नगरी दुमदूमून गेली आहे. पहाटेपासून चंद्रभागेचे पवित्र स्नान करून परंपरेनुसार शेकडो वारकरी दिंड्यासह प्रदक्षिणा मार्गावर विविध संतांचे अभंग म्हणत प्रदक्षिणा पुर्ण केली. भाविकांनी चंद्रभागा स्नान, नगरप्रदक्षिणा, कळस दर्शन तसेच श्री.विठ्ठल-रुक्मिणी मातेचे पददर्शन व मुख दर्शन घेतले. चंद्रभागा वाळवंट, 65 एकर, मंदिर परिसर भाविकांसह टाळ मृदूंगाच्या जयघोषाने दुमदुमून निघाला आहे.