
Pune Book Festival: शांतता… पुणेकर वाचत आहेत’! 1 लाखांपेक्षा अधिक फोटोज..;
पुणे: पुणे शहरात वाचनसंस्कृती बळकट करण्याच्या उद्दिष्टाने राबविण्यात आलेल्या ‘शांतता… पुणेकर वाचत आहेत’ या उपक्रमाने यंदा ऐतिहासिक टप्पा गाठला असून विशेष म्हणजे महिलांचा ५१ टक्के आणि पुरुषांचा ४९ टक्के असा संतुलित सहभाग नोंदवत पुणेकरांनी (Pune) वाचनाचा सामूहिक संकल्प अधिक दृढ केला. सायंकाळी पाचपर्यंत वैयक्तिक वाचनाची १.३५ लाखांहून अधिक छायाचित्रे अपलोड झाली, तर गट सहभागासह एकूण वाचनसंख्या तब्बल ७.५२ लाखांवर पोहोचली.
पुण्याला ‘पुस्तकांची राजधानी’ बनविण्याच्या उंच ध्येयाने सुरू झालेल्या ‘शांतता… पुणेकर वाचत आहेत’ या उपक्रमाने यंदा अभूतपूर्व उत्साहाची नोंद केली. सर्व वयोगटातील पुणेकरांनी पुस्तकवाचनाच्या सामूहिक मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभागी होत शहराला नव्या वाचनचैतन्याने भरून काढले.
या उपक्रमाचा ‘गोल्डन अवर’ ठरलेल्या सकाळी ११ ते १२ या वेळेत शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, रेल्वे स्थानके, बसस्थानके, मेट्रो, धार्मिकस्थळे, सार्वजनिक ग्रंथालये, शासन आणि खाजगी कार्यालये, आयटी कंपन्या, उद्योग, सामाजिक संस्था अशा विविध ठिकाणी मोठ्या संख्येने वाचक एकत्र जमले. या एका तासातच तब्बल ७० हजारांहून अधिक नागरिकांनी पुस्तक वाचून आपली छायाचित्रे लिंकवर अपलोड केली.
Pune Book Festival 2024: वाचन प्रेमींकडून तब्बल 25 लाख पुस्तकांची खरेदी अन् 40 कोटींची…
सुमारे १२ हजार गटांनी छायाचित्रे अपलोड केली असून प्रत्येक गटातील किमान ५० वाचकांचा विचार करता किमान ६ लाखांहून अधिक नागरिकांनी गट स्वरूपात वाचन केले. परिणामी वैयक्तिक आणि गट अशा दोन्ही प्रकारच्या सहभागाची एकूण किमान वाचकसंख्या ७,५२,३१५ अर्थात साडेसात लाखांपेक्षा जास्त झाली. या उपक्रमात १७ ते २२ वयोगटातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग सर्वाधिक राहिला. शाळा तसेच उच्चशिक्षण संस्थांनीही विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत वाचनसंस्कृती वाढविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. ९ डिसेंबर रोजी सकाळी ११ ते १२ या वेळेत सर्वाधिक छायाचित्रे अपलोड झाली आणि हा कालावधी सर्वाधिक गजबजलेला ठरला.
सर्वाधिक वाचली गेलेली पुस्तके
– छत्रपती शिवाजी महाराज (चरित्र)
– श्यामची आई
– रिच डॅड पुअर डॅड
– अल्केमिस्ट
– ऑटोमॅटिक हॅबिट्स
– थिंक अँड ग्रो रीच
– विंग्स ऑफ फायर
– द पॉवर ऑफ युअर सबकाँशीयस माईंड
-स्टीव्ह जॉब्स (चरित्र)