pune Dhruvatara Abhishika library fire case update
पुणे : पुण्यामध्ये आगीच्या घटना वाढल्या आहेत. शहरातील मध्यवर्ती भागामध्ये असलेल्या ग्रंथालयाला आग लागली असून यामध्ये पुस्तकांचे मोठे नुकसान झाले आहे. ग्रंथालयातील पुस्तकं आगीमध्ये खाक झाली असून यामुळे वाचकांनी हळहळ व्यक्त केली आहे.
पुण्यातील नवी पेठेमध्ये गांजवे चौकाजवळ ही आग लागली आहे. या परिसरामध्ये अनेक स्पर्धा परिक्षांचे विद्यार्थी वाचन आणि अभ्यास करत असतात. यातील ध्रुवतारा अभ्यासिकेला आग लागली. तिसऱ्या मजल्यावर असलेल्या या ग्रंथालयाला आग लागली. सुमारे सकाळी 7 वाजता अग्निशमन दलाला याबाबत वर्दी आली.
घटनेची माहिती कळताच अग्निशमन दल तातडीने घटना स्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाकडून चार वाहने आणि दोन वॉटर टॅंकर दाखल झाले आहेत. अग्निशमन दलाकडून अर्धा तासामध्ये आगीवर नियंत्रण आणण्यात आली. या आगीमध्ये पुस्तक, कपाटं आणि ग्रंथालयातील कॉम्पुटर यांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ग्रंथालयामध्ये आग नेमकी का लागली याचे स्पष्ट कारण समोर आलेली नाही. ग्रंथालयामध्ये काल रात्रीच पेस्ट कंट्रोल करण्यात आले होते. मात्र हे आगीचे कारण ठरणार नाही. ठोस कारण शोधण्यात येईल, अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी नवराष्ट्रला दिली.