Human skeletons were lying on the road on Yerawada Nagar road Pune News Update
Pune human skeleton on road : पुणे : अक्षय फाटक : शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये वर्दळीच्या ठिकाणी एक विचित्र प्रकार घडलेला दिसून आला आहे. लोकांची गर्दी असलेल्या नगर रस्त्यावर भरदुपारी एका ठिकाणी मानवी सांगाडा पडला असल्याचे दिसून आले. सांगाडा असल्याची माहिती वाऱ्यासारखी येरवडा परिसरात समजली अन् एकच खळबळ उडाली. नागरिकांनी घटनास्थळी धाव तर घेतली, पण यामुळे एक भीतीचं वातावरण पसरलं. गोंधळही उडाला.
पुणे तिथे काय उणे असे म्हणतात. पुण्यातील भररस्त्यामध्ये मानवी सांगाडा पडला असल्याचे आढळून आले. याचे फोटो आणि व्हिडिओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. यामुळे बघ्यांची देखील मोठी गर्दी वाढली. येरवडा परिसरामध्ये हा प्रकार घडला. वाऱ्यासारखी बातमी पसरल्यानंतर पोलिसांनी तातडीने येथे धाव घेत तपास सुरू केला. तेव्हा तो सांगाडा खरा नसून प्लास्टर ऑफ पॅरिसने तयार केलेला कृत्रिम सांगाडा असल्याचे उघड झालं. नंतर पोलिसांनी सुटकेचा श्वास सोडला आणि दुसरीकडे भीतीचे वातावरणही दूर झाले.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
येरवड्यातील गोल्डन आर्क लॉज समोर ही घटना घडली. याप्रकरणात घटनेची नोंद करण्यात आली आहे. गुरुवारी दुपारी मानवी सांगाडा पडल्याची माहिती नागरिकांनी दिली. परिसर अत्यंत वर्दळीचा आणि व्यापारी हालचालींचा आहे. त्यामुळे ही माहिती समोर येताच काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. दुपारची वेळ असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक आणि वर्दळही होती. मानवी सांगडा दिसल्याच्या माहितीने एखाद्या चित्रपटात शोभावी तशी पोलिसांच्या गाड्या व कर्मचाऱ्यांची “इन्ट्री” झाली. आपसूकच त्यामुळे पादचारी व वाहनचालकांना नेमकं काय झालं हे पाहण्याची उत्सुकता निर्माण झाली आणि नागरिकांनी तोबा गर्दी केली. मग काही वेळातच “माणसाचा सांगाडा सापडला” असल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे येरवडा भागात एक भीतीचे वातावरण पसरले.
पोलिसांनी घटनास्थळी पाहणी सुरू केली. त्यावेळी छाती व कमरेचा सांगाड्याचा भाग पडलेला आढळला. सुरुवातीला खरा सांगाडा असल्याचा समज झाला. मात्र बारकाईने तपास केल्यानंतर तो प्रयोगशाळेत वापरण्यासाठी बनवलेला आर्टिफिशियल सांगाडा असल्याचे स्पष्ट झाले. तो प्लास्टर ऑफ पॅरिसपासून तयार करून तारेने जोडलेला होता, असे समोर आले. नंतर पोलिसांनी सुटकेचा श्वास सोडला.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
संशयास्पद काही नाही
पोलिसांनी सांगाड्याची तपासणी करून त्यात कोणताही गुन्हेगारी प्रकार किंवा संशयास्पद बाब आढळून आली नसल्याचे स्पष्ट केले. पोलिसांनी सांगाडा ताब्यात घेतला असून, माहिती नोंदवून पुढील कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणाबाबत येरवडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेळके म्हणाले, “सांगाड्याची तपासणी केली असता तो कृत्रिम असल्याचे समजले. कोणत्याही प्रकारचा गुन्हा अथवा संशयास्पद बाब या प्रकरणी आढळलेली नाही. नागरिकांनी अफवा पसरवू नयेत आणि भीती न बाळगता सत्य माहितीची खात्री करूनच प्रतिक्रिया द्यावी.”
वाढते खोट्या माहितीचे प्रकार
गेल्या दोन महिन्यांत शहर पोलिसांकडे खोट्या किंवा दिशाभूल करणाऱ्या गंभीर तक्रारींचे प्रमाण वाढले असल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यामुळे अशा माहितीवर तात्काळ धाव घेणे भाग पडते. येरवड्यातील गुरुवारी घडलेली घटना हे त्याचेच उदाहरण ठरले.