दिल्लीतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुनेत्रा पवार यांनी स्पष्टीकरण दिले (फोटो - टीम नवराष्ट्र)
Sunetra Pawar in RSS: मुंबई : राष्ट्रवादी अजित पवार गट हा पुरोगामी विचारांवर चालणारा पक्ष मानला जातो. अनेकदा अजित पवार हे आपल्या भाषणामध्ये शाहू फुले आंबेडकर यांचे विचार मानत असल्याचे सांगत असतात. पण सध्या सोशल मीडियावर अजित पवार यांच्या पत्नी आणि राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांचा फोटो व्हायरल होत आहे. सुनेत्रा पवार या नवी दिल्लीमधील आरएसएसच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्या होत्या. यावरुन राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांनी जोरदार टीका केली आहे. यावर आता खासदार सुनेत्रा पवार यांनी स्पष्टीकरण देत सावरासावर करण्याचा प्रयत्न केला आहे.
भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना राणौत यांच्या घरी राष्ट्र सेविका समितीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याचे फोटो कंगना राणौतने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. महिला शाखेच्या या कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादी नेत्या व खासदार सुनेत्रा पवार या देखील उपस्थि होत्या. कंगना राणौत हिने सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले आहे की, आज माझ्या निवासस्थानी ‘राष्ट्र सेविका समिती’ महिला शाखेचे आयोजन करण्यात आले होते. आपण एकत्रितपणे सनातन मूल्ये, हिंदू संस्कृती आणि राष्ट्रीय जाणीव अधिक प्रमुख बनवू. आपण सर्वांनी मानव सेवा, राष्ट्रनिर्माण आणि सनातन संस्कृतीचे जतन करण्यासाठी सतत काम करण्याचा संकल्प केला आहे. महिलांची जागरूकता आणि सहभागच राष्ट्राला बलवान बनवतो, असे लिहित कंगना राणौतने या कार्यक्रमाची माहिती दिली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राष्ट्र सेवा समितीच्या बैठकीमधील राष्ट्रवादी खासदार सुनेत्रा पवार यांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर जोरदार टीका करण्यात आली. यावर खासदार सुनेत्रा पवार म्हणाल्या की, “एका मीटिंगमध्ये माझ्या उपस्थितीबाबत चर्चा सुरू आहे, ज्याबाबत मी स्पष्टीकरण देऊ इच्छिते की त्यामागे कोणताही राजकीय उद्देश्य नव्हता. यात इतर महिला खासदारही सहभागी होत्या. राज्यसभेच्या खासदार म्हणून आणि बारामतीमध्ये दीर्घकाळ सामाजिक कार्य करत असताना, मला विविध महिला संघटनांच्या कामाची प्रत्यक्ष ओळख करून घेण्याची उत्सुकता असते. त्या बैठकीत विविध राज्यांतील महिला सहभागी होत्या. त्यांचे उपक्रम आणि कार्यपद्धती समजून घेण्यासाठीच मी तिथे गेले होते,” असे कारण सुनेत्रा पवार यांनी आरएसएसच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याबाबत सांगितले आहे.
एका मीटिंगमध्ये माझ्या उपस्थितीबाबत चर्चा सुरू आहे, ज्याबाबत मी स्पष्टीकरण देऊ इच्छिते की त्यामागे कोणताही राजकीय उद्देश्य नव्हता. यात इतर महिला खासदारही सहभागी होत्या. राज्यसभेच्या खासदार म्हणून आणि बारामतीमध्ये दीर्घकाळ सामाजिक कार्य करत असताना, मला विविध महिला संघटनांच्या…
— Sunetra Ajit Pawar (@SunetraA_Pawar) August 21, 2025
पुढे त्या म्हणाल्या की, “त्या वेळी मला बोलण्यास सांगितले, तर मी फक्त दोन शब्दात माझी भूमिका मांडली. कृपया माझ्या या उपस्थितीचा राजकीय अर्थ काढू नये. समाजातील महिलांचे कार्य समजून घेणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे हाच माझा उद्देश होता, आहे आणि राहील,” असे देखील मत राष्ट्रवादी खासदार सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केले आहे. सोशल मीडिया पोस्ट करत त्यांनी सावरासावर करण्याचा प्रयत्न केला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
सुनेत्रा पवार या राष्ट्र सेवा समितीच्या बैठकीमध्ये सहभागी झाल्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते व आमदार रोहित पवार यांनी जोरदार टीका केली होती. रोहित पवार म्हणाले की, “जेव्हा ओबीसी आरक्षण देण्यात आलं त्यावेळी कमंडल यात्रा काय होती हे आरएसएसच्या प्रमुखांना त्यांनी विचारलं पाहिजे होतं. सत्तेमध्ये ते गेले आहेत. त्याची कारणं ही वेगळी आहेत. पण तिथं गेल्यानंतर त्यांचे विचार काही त्यांनी स्वीकारले नसतील. पण कुठेतरी त्यांच्यावर प्रेशर असेल की एखाद्या बैठकीला या. एखादा फोटो येऊ द्या…म्हणजे ते आरएसएसचा विचार स्वीकारत असल्याचा संदेश जातो. एका बाजूला तुम्ही पुरोगामी विचार म्हणता. चव्हाण साहेबांचे, शाहू फुले आंबेडकरांचे नाव घेता आणि दुसरीकडे आरएसएसच्या बैठकीला तुम्हा किंवा तुमचे प्रतिनिधी जात असतील तर ही दुटप्पी भूमिका आहे. आणि आज राजकारणामध्ये लोकांना दुटप्पी भूमिका नको आहे,” अशा शब्दांत रोहित पवार यांनी जोरदार टीका केली.