सी पी राधाकृष्णन यांच्यासाठी सीएम फडणवीसांनी फोन केल्यामुळे खासदार संजय राऊतांनी टीका केली (फोटो - टीम नवराष्ट्र)
Sanjay raut Marathi News : मुंबई : देशामध्ये उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार आहे. त्यासाठी जोरदार राजकारण रंगले असून नेत्यांच्या भेटीगाठी आणि फोन सुरु झाले आहेत. येत्या 9 सप्टेंबर रोजी उपराष्ट्रपती पदासाठी मतदान होणार आहे. एनडीएकडून महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना तर इंडिया आघाडीकडून सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मतदानासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीमधील नेत्यांना फोन केले आहेत. यावरुन आता खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे.
खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी फोन केल्यामुळे संजय राऊतांनी त्यांच्यावर टीका केली आहे. खासदार संजय राऊत म्हणाले की, ठाकरेंच्या शिवसेनेने सुदर्शन रेड्डींना पाठिंबा दिलेला आहे. मला आर्श्चय या गोष्टीचे वाटते की, बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष किंवा शरद पवारांचा पक्ष तुम्ही संविधानाच्या विरोधात फोडला. आमदार खासदार 50-50 कोटींना विकत घेतले. देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या लोकांनी आणि तुम्ही त्याच पक्षाकडे मतं मागत आहात. हे फक्त आमच्याकडे नाही तर देशभरात अशी मते मागितली, अशी टीका खासदार संजय राऊतांनी केली.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे संजय राऊत म्हणाले की, “तुमच्याकडे पूर्ण पाठिंबा असताना तुम्ही मते का मागत आहात? आणि तुम्हाला आमच्याकडे मते मागण्याचा काय अधिकार आहे? तुम्हाला भीती वाटते का तुमची मते फुटतील? डुबप्लिकेट जी शिवसेना आहे, त्यांचीही मते फुटतील असे तुम्हाला वाटते का? कारण वातावरण तसे आहे. ही उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक इतकी सहज नाहीये,” असे देखील मत संजय राऊत यांनी मांडले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी फोन केला होता. याबाबत राऊत म्हणाले की, “ते महाराष्ट्राचे मतदार आहे तर त्यांनी धोतर नेसून जायला हवे होते ना…मग ते लुंगी नेसून का गेले, देवेंद्र फडणवीसांनी आम्हाला ती चाणक्यगिरी शिकू नये, राज्यपाल हा राज्यात असतो त्यावेळी तो त्या राज्याचा प्रथम नागरिक असतो. आम्हालाही घटना माहिती आहे आणि आम्ही त्यांच्यापेक्षा अधिक घटनेचे पालक करतो. फडणवीस आम्हाला काय सांगतात त्यांचे मूळ हे तामिळनाडू आहे,’ अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे.