पुण्यातील नाट्यगृहांचे नूतनीकरण 'या' महिन्यापर्यंत होणार; वारंवार येणाऱ्या समस्यांना मिळणार पूर्णविराम
पुणे/प्रगती करंबेळकर : नाट्यगृहांच्या वारंवार येणाऱ्या समस्यांना पूर्णविराम मिळणार आहे. महानगरपालिकेकडून आगामी काळात पुण्यातील नाट्यगृहांचे नूतनीकरण केले जाणार आहे. जानेवारीपर्यंत बालगंधर्व रंगमंदिर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृह अशा महत्त्वाच्या नाट्यगृहांचे नूतनीकरण होणार आहे, अशी माहिती महानगरपालिका नाट्यगृह विभागाचे मुख्य व्यवस्थापक राजेश कामठे यांनी दिली.
राजेश कामठे म्हणाले, नाट्यगृहांची सद्यस्थिती चांगली नाही हे म्हणणे चुकीचे आहे. प्रत्यक्षात दर महिन्याला साधारणपणे ३० ते ३५ व्हीआयपी कार्यक्रम हे महापालिकेच्या नाट्यगृहांमध्ये होतात. मात्र, या नाट्यगृहांचे दर्जात्मक सुधारणा करण्याची गरज आम्ही ओळखली आहे. त्यानुसार बालगंधर्व रंगमंदिर आणि यशवंतराव चव्हाण नाट्यगृहांतील खुर्च्या आणि एसी दुरुस्तीचे काम सुरू करणार असून, हे काम जानेवारीपर्यंत पूर्ण केले जाईल. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह अजूनही अधिक सक्षम आणि आधुनिक स्वरूपात विकसित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच पुढील महिन्यात बालगंधर्व रंगमंदिराचे रंगकाम सुरू होणार असून, त्याची ग्रीन रूमही नव्याने सजविण्यात येणार आहे. मागील वर्षी सर्व नाट्यगृहांच्या ग्रीन रूममध्ये एसी बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. कलाकारांच्या मागणीनुसार ग्रीन रूमची स्थिती सुधारण्याचा आमचा उद्देश आहे.
पुढील महिन्यात कँटीन
कोरोना काळानंतर बंद पडलेली नाट्यगृहांतील कॅन्टीन व्यवस्था आता टप्प्याटप्प्याने सुरू केली जात आहे. राजेश कामठे म्हणाले, बालगंधर्व रंगमंदिर आणि यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथील कॅन्टीन पुन्हा सुरू झाले आहेत. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहातील कॅन्टीनही पुढील महिन्यात सुरू करण्यात येणार आहे.
ठाकरे बालनाट्यगृहाची नोंदणी अजूनही रखडलेली
ठाकरे बालनाट्यगृहाबद्दल बोलताना राजेश कामठे यांनी सांगितले, ठाकरे बालनाट्यगृह सांस्कृतिक भवन विभागाच्या अंतर्गत आलेले नाही त्याचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही त्यामुळे ते कधी चालू होईल याची शाश्वती मी देऊ शकत नाही.