माणसाने जगात औद्योगिक क्रांती केली खरी पण नैसर्गिक साधनसंपत्ती आणि सर्वात महत्वाचं म्हणजे निसर्गाला ऱ्हास करुन अनेकदा आपली स्वार्थी वृत्ती दाखवली आहे. आजकाल वेळी अवेळी पडणारा पाऊस असो किंवा दरवर्षी तापमानात होणारी वाढ असो या सगळ्या समस्या निर्माण होत आहेत त्याचं कारण म्हणजे ग्लोबल वार्मिंग. पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी जागतिक आणि देशपातळीवर देखील अनेक विविध उपाययोजना राबवल्या जातात. मात्र आता पुण्यात देखील वसुंधरा पायी दिंडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे.
दिनांक ०६ ऑक्टोबर २०२५, पुणे येथील श्री क्षेत्र पश्चिम महाराष्ट्र, नर्हे, तालुका पश्चिम हवेली, जिल्हा पुणे येथे वसलेल्या जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी स्थापित रामानंद संप्रदाय, पुणे उपपीठाहून पायी दिंडीचे प्रस्थान ०६ ऑक्टोबर २०२५ रोजी झालेले आहे. या पायी दिंडी मध्ये हजारो भाविक पुण्यापासून श्रीक्षेत्र नाणीजधाम (रत्नागिरी) पर्यंत शेकडो किलोमीटरचा प्रवास पायी चालून जाणार आहेत.
जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या २१ ऑक्टोबर २०२५ रोजी ५९ वा वाढदिवस येत आहे. रामानंद संप्रदायाचे मुख्यपीठ नाणीजधाम येथे हा उत्सव या दिवशी अनेक वर्ष साजरा केला जातो. त्यादिवशी हि दिडी नाणीजधाम येथे दाखल होणार आहे.पुण्याबरोबरच तेलंगणा उपपीठ, उत्तर महाराष्ट्र (नाशिक) उपपीठ, मराठवाडा (परभणी) उपपीठ, मुंबई उपपीठ (वसई) व पूर्व विदर्भ (नागपूर) व गोवा या ७ उपपिठाहून देखील अश्याच प्रकारे पायी दिंड्या निघणार आहेत.
या दिंडीला ‘वसुंधरा पायी दिंडी’ असे नाव देण्यात आले आहे.या दिंडीतून, सध्या अत्यंत जिकरीच्या पण तेवढ्याच दुर्लक्षित असलेल्या ग्लोबल वॉर्मिंग या विषयावर प्रकाश टाकला जात आहे. यावर केवळ संदेशच न देता त्यांच्या कृतीतूनही संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे. हजारो लोकांची खाण्या पिण्याची, राहण्याची, मलमूत्र विसर्जनाची, अंघोळीची सोय करताना पर्यावरणाला काहीही हानी होणार नाही याची काळजी आयोजकांकडून घेतली जात आहे. मागे कचरा होणार नाही याची खबरदारी घेण्यासाठी विशेष सेवेकरींचे पथक या दिंडीत सामील आहे. सोबत टॉयलेट व्हॅन देखील तैनात आहे, तसेच सोबत पिण्याचे पाणी, आणि स्वच्छतेसाठी लागणारे पाणी घेऊन २ स्वतंत्र टैंकर्स देखील दिंडी सोबत कायम सज्ज आहेत. त्याचसोबत या दिंडीच्या माध्यमातून दरदिवशी वृक्षारोपण देखील केले जात आहे.