Diwali 2025: सजावटीतून सजगतेकडे; दिवाळी भेटवस्तूंमध्ये बदलता ट्रेंड
सुनयना सोनवणे/ पुणे: दिवाळी येतेय…. दिवाळी म्हणजे उजेडाचा आणि आनंदाचा सण! या सणात भेट देणे म्हणजे आपुलकीचा, प्रेमाचा आणि कृतज्ञतेचा भाव व्यक्त करण्याचा पारंपरिक मार्ग. मात्र यावर्षीच्या भेटवस्तू ट्रेंडमध्ये एक नवा बदल दिसून येतो आहे. नागरिकांचा कल आता केवळ सजावटीच्या वस्तूंवर न थांबता इको-फ्रेंडली आणि आरोग्यदायी हॅम्पर्सकडे झुकत आहे.
बाजारात वाढती मागणी
गेल्या काही वर्षांत ‘गिफ्ट हॅम्पर्स’ ही संकल्पना अधिक आकर्षक बनली आहे. आधुनिक पॅकिंगमध्ये सादर केलेल्या पारंपरिक मिठाई आणि ड्रायफ्रूट बॉक्सेसना अधिक मागणी मिळत आहे. या वर्षी इको-फ्रेंडली आणि आरोग्यदायी हॅम्पर्सच्या विक्रीत ३० ते ४० टक्क्यांनी वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी नवराष्ट्राशी बोलताना सांगितले. अगदी ३०० रुपयांपासून तीन ते चार हजार रुपयांपर्यंत याच्या किमती आहेत. रिटेल आणि होलसेल नुसार दरात बदल होतात.
इको-फ्रेंडली हॅम्पर्स – सणासोबत निसर्गाची सांगड
जूटचे बास्केट्स, मातीचे दिवे, पुनर्वापर करता येणाऱ्या काचेच्या बाटल्या आणि सेंद्रिय उत्पादनांनी भरलेले इको-फ्रेंडली हॅम्पर्स ही नव्या पिढीची पसंती ठरत आहेत. काही ब्रँड्स तर स्थानिक कारागिरांकडून थेट वस्तू घेऊन ‘मेड इन इंडिया’ संकल्पनेला प्रोत्साहन देत आहेत.
आरोग्यदायी हॅम्पर्स
हर्बल चहा, सेंद्रिय मध, सुकामेवा, सुगंधी मेणबत्या आणि नैसर्गिक स्किनकेअर सेट्सने सजलेले वेलनेस हॅम्पर्स विशेष लोकप्रिय झाले आहेत.
यामुळे भेटवस्तूमध्ये ‘हेल्दी लाइफस्टाईल’चा विचार पुढे येत आहे.
घर सजावटीच्या वस्तू -पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड
हस्तकला, टेराकोटा शोपीसेस, छोट्या इनडोअर प्लांटर्स आणि आकर्षक दिवे यांचा वापर करून घराच्या सजावटीला नवा अंदाज दिला जात आहे. दिवाळीत घराला झळाळी देताना पर्यावरणपूरकतेचा विचारही जपला जातो आहे.
मिठाई आणि सुकामेवा हॅम्पर्स – पारंपारिकेतला आधुनिक स्पर्श
पारंपरिक मिठाई आणि ड्रायफ्रूट हॅम्पर्स अजूनही आवडीचे ठरतात. मात्र आता त्या कमी साखरेच्या, सेंद्रिय घटकांनी तयार केल्या जात आहेत. सणासुदीच्या आकर्षक पॅकिंगमुळे ते दिसायलाही अधिक मोहक वाटतात.
‘ग्रीन दिवाळी’कडे वाटचाल
या वर्षीचा दिवाळी भेटवस्तूचा ट्रेंड ‘सजावट आणि आनंदातही जबाबदारी असावी!’ असा संदेश देतो आहे. शाश्वत आणि आरोग्यदायी हॅम्पर्समुळे दिवाळी आता केवळ चमकदारच नाही तर जागरूक सणही ठरत आहे.
‘आता ग्राहक भेटवस्तू निवडताना फक्त दिसण्यावर नव्हे तर त्याच्या उपयोगिता आणि पर्यावरणपूरकतेकडेही पाहतात. यावर्षी सुकामेवा हॅम्पर्सना जास्त पसंती मिळत आहे. कॉर्पोरेट क्षेत्रात भेटवस्तू देण्यासाठी हाताने तयार केलेल्या सुंदर हॅम्पर्सनाही जास्त मागणी आहे.’
-शैलजा जाधव, घरगुती व्यावसायिक
दिवाळी हॅम्पर्ससाठी रेडिओ एफएम, हेडफोन्स अशा इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, डायरी, पाणी बॉटल, पेन, तसेच चांदीचा लेप असलेले डबे, कटोरी यांना जास्त मागणी आहे. होलसेल आणि रिटेल दरात विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
-निकिता बोरा, व्यावसायिक