स्त्री सशक्ततेचा स्त्री टॉक्स चित्रपट 'या' तारखेला होणार प्रदर्शित; तृप्ती देसाई दिसणार प्रमुख भूमिकेत
पुणे/प्रगती करंबेळकर : महिलांच्या भावनिक, सामाजिक आणि मानसिक प्रवासावर प्रकाश टाकणारा ‘स्त्री टॉक्स’ हा हिंदी चित्रपट येत्या महिला दिनाचे औचित्य साधून ८ मार्चला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. अशी माहिती सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक आशिष कैलास जैन उपस्थित होते.
तृप्ती देसाई म्हणाल्या, चित्रपटाच्या कथानकात वेगवेगळ्या स्वभावाच्या ११ ते १२ महिला स्वतःला ‘डिटॉक्स’ करण्यासाठी एकत्र येतात, आणि या प्रवासात त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या सामाजिक, भावनिक आणि मानसिक घडामोडींचे वास्तववादी चित्रण केले गेले आहे. ‘स्त्री टॉक्स ’ मध्ये मासिक पाळी या विषयावर धर्म, देव आणि परंपरांशी जोडल्या जाणाऱ्या दृष्टीकोनावर गंभीर पण संवेदनशील भाष्य करण्यात आले आहे. तसेच ड्रग एडिक्शन, स्त्री स्वातंत्र्य आणि अंतर्गत संघर्ष या ठळक आणि बोल्ड विषयांनाही चित्रपटात स्पर्श करण्यात आला आहे.
तृप्ती देसाईंच्या भूमाता ब्रिगेडची ही भूमिका असून, अभिनेत्री म्हणून यांचा हा पहिला चित्रपट आहे. चित्रपटाचे निर्माते नवीन पवार, छायाचित्रकार समीर सोनवणे, कार्यकारी निर्माती रोहिणी मानकर असून, कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन आशिष कैलास जैन यांनी केले आहे.