पालखी सोहळ्यासाठी पुणे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त; तब्बल 'इतके' कर्मचारी तैनात
पुणे : संत श्री तुकाराम महाराज आणि संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला असून, तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा १६० किलोमीटरचा तर ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा ६५ किलोमीटरचा प्रवास करणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी दिली. आषाढी वारी सोहळ्यास सुरूवात झाली असून, पुण्यानंतर जिल्ह्यातून हा पालखी सोहळा श्रीक्षेत्र पंढरपूरकडे मार्गस्थ होतो. या निमित्ताने पुणे ग्रामीण पोलिसांनी चोख नियोजन केले आहे.
तुकाराम महाराजांचा पालखा सोहळा २३ जून रोजी उरुळी कांचन येथे मुक्कामी असणार आहे. तर ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा २२ जून रोजी झेंडेवाडी येथे मुक्कामी थांबणार आहे. येथून पुणे ग्रामीण पोलिसांकडून वारी सोहळ्याचे नियोजन केले आहे. दोन्ही पालख्यांचा आठ दिवस मुक्काम जिल्ह्यात असणार आहे.
पोलिसांकडून पालखी मार्ग, विसावा ठिकाणांची आणि मुक्काम स्थळांची पाहणी करण्यात आली आहे. वाहतूक नियोजन, आरोग्य सुविधा, आपत्कालीन व्यवस्था आणि विशेष पोलीस बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे. पालखी मार्गावर कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी ड्रोनद्वारे पाहणी केली जात आहे.
फिरते पोलीस ठाणे
पालखी मार्गावर पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांच्या संकल्पनेतून ‘फिरते पोलीस ठाणे’ उभारण्यात आले आहे. जे वारी सोहळ्यासोबत असणार आहे. त्यामध्ये अधिकाऱ्यांसह महिला पोलिसांचा समावेश असणार आहे. फिरते पोलीस ठाणे हे प्रत्येक अडचण सोडवणार असून, भाविक व वारकऱ्यांना मदत करणार आहे. सोबतच महिला छेडछाड, चोरी, मोबाईल स्नॅचिंग अशा घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष पथके नेमण्यात आली आहेत.
दहा दिवसांत १० हजार झाडे लावणार
वारी सोहळ्यादरम्यान ग्रामीण पोलिसांकडून ‘हरित वारी’ या संकल्पनेनुसार पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात येणार आहे. १ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवले असून, बऱ्हाणपूर (बारामती) येथे ६०० झाडे लावण्यात आली आहेत. तसेच सोहळ्यातील १० दिवसांत जिल्ह्यात दहा हजार झाडे लावण्यात येणार असून, यासाठी संबंधित पोलीस ठाण्यांना जबाबदारी देण्यात आली आहे.
चिकन दुकान व दारू दुकाने बंद
पालखी मार्गावर असणाऱ्या गावांमधील दारू व चिकन दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासंदर्भाने स्थानिक नागरिक तसेच ग्रामपंचायत बैठक घेण्यात आली आहे. व्यावसायिकांना नोटीस बजावण्यात आली आहे. काही ढाबे मालकांनी स्वतःहून सेवा बंद ठेवण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. वारी मार्गावर अतिरेकी ध्वनीप्रदूषण टाळण्यासाठी म्युझिक वाजवण्यास बंदी आहे. स्वागत कक्ष व मंडप उभारणी करताना वारी सोहळ्यास कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.
असा आहे बंदोबस्त…
अतिरीक्त पोलीस अधीक्षक- २
डीवायएसपी- १०
पोलीस निरीक्षक- ३५
पोलीस अंमलदार- १६२४
वाहतूक बंदोबस्त
पोलीस अधिकारी- १०
वाहतूक अंमलदार- ११०
होमगार्ड- ११८७
आरसीपी, एसआरपीएफ, क्युआरटी प्रत्येकी १ पथक