कर्वेनगर येथील धनुर्विद्या क्रीडा संकुलाचा मार्ग अखेर मोकळा; दुधानेंच्या पाठपुराव्याला यश
पुणे : पुण्यातील कर्वेनगर प्रभागात धनुर्विद्या संकुलाकरिता गेल्या साडेतीन ते चार वर्षांपासून माजी नगरसेविका लक्ष्मी दुधाने आणि शरदचंद्र पवार पक्षाचे कोथरुड विधानसभा अध्यक्ष स्वप्निल दुधाने यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. यासाठी निधी उपलब्ध करत सातत्याने केलेल्या या पाठपुराव्यास यश आले आहे. यासाठी खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या विशेष सहकार्यातून वेळोवेळी शासन दरबारी आणि अन्य ठिकाणीही सर्वतोपरी प्रयत्न केले. या प्रयत्नांना अखेर यश मिळाले आहे. येत्या १६ तारखेला क्रीडा संकुलाचा भूमिपूजन सोहळा होणार आहे.
याबाबत माहिती देताना स्वप्निल दुधाने म्हणाले की, पुण्यनगरीतील कर्वेनगर येथे पुणे महानगरपालिकेचे पहिले धनुर्विद्या संकुल म्हणून ओळखले जाणारे हे संकुल पुणे शहरातील अनेक खेळाडूंच्या स्वप्नांना पंख देणारे आहे. यासाठी जागा उपलब्ध व्हावी, म्हणून जमीन मालक असणाऱ्या शेतकरी वर्गाला विश्वासात घेऊन जमिन पुणे मनपाकडे हस्तांतरीत करण्यात आली. त्यानंतर पुणे मनपाच्या वार्षिक अंदाजपत्रकात तरतूद व्हावी, यासाठी तब्बल तीन वर्षे प्रयत्न करण्यात आले असून, सर्व तांत्रिक अडचणी, शासकीय परवानगी तसेच वेळोवेळी केलेला पाठपुरावा यानंतर हा प्रकल्प उभारत आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या विशेष सहकार्यातून आजमितीस तब्बल १ एकर आरक्षित जागेवर हा प्रकल्प साकारत असताना सदर काम अत्यंत उत्कृष्ट आणि उच्च दर्जाचे व्हावे, यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, अशी माहिती दुधाने यांनी दिली.
गुरुवार, दिनांक १६ ऑक्टोबर रोजी हा भूमिपूजन सोहळा खासदार सुप्रिया सुळे यांच्या शुभहस्ते आणि मनपा आयुक्त नवल किशोर राम आणि पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत असून, ही आमच्यासह अनेक खेळाडूंची स्वप्नपूर्ती असेल, यात शंकाच नाही. या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी आपण सर्वांनी आवर्जून उपस्थिती दर्शवत कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन दुधाने यांनी केले.