
जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी राजकीय हालचालींना वेग; दौंडमध्ये दोन दिवसात 322 उमेदवारी अर्जाचे वाटप
राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची अधिकृत घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली आहे. ६ फेब्रुवारीला मतदान तर ७ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. मात्र १६ जानेवारीपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी दौंड तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी १९८ उमेदवारी अर्जांचे वाटप झाले असून, १०१ अर्जदारांनी नामनिर्देशन फॉर्म घेतले आहेत. शनिवार आणि रविवारी या शासकीय सुट्टीच्या दिवशीही निवडणुकीचे कामकाज चालू राहणार आहे. त्यामुळे इच्छुक असलेल्या उमेदवारांची अर्ज घेण्यासाठी आणि भरण्यासाठी दौंड येथील नवीन प्रशासकीय इमारतीत गर्दी होत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
शुक्रवारी (दि. १६) १९८ उमेदवारी अर्जाची विक्री झाली असून १०१ अर्ज घेतले आहेत. तर शनिवारी (दि. १७)१२४ अर्ज वाटप झाली असून, ६३ अर्ज घेतले आहेत. दोन दिवसात ३२२ उमेदवारी अर्ज वाटप झाले असून १६४ अर्ज घेतले आहेत. त्यामध्ये जिल्हा परिषदेसाठी १८५ तर पंचायत समितीसाठी १३७ अर्ज घेतले आहेत.
तालुक्यात पंचायत समिती गण संख्या १४
दौंड तालुक्यात जिल्हा परिषद गट संख्या ७ असुन पंचायत समिती गण संख्या ही १४ आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी दौंडमधील निवडणूक निर्णय अधिकारी यांची तयारी पूर्ण झाली आहे. ३१७ मतदान केंद्र आहेत. एकूण २ लाख ७३ हजार १०० मतदार संख्या आहे. यामध्ये १ लाख ४० हजार ४१४ पुरुष मतदार तर २ लाख ३२ हजार ६७९ महिला मतदार आणि ०७ इतरांना मतदारांचा समावेश आहे.
अशी आहे प्रशासकीय यंत्रणा
या निवडणुकीसाठी २१ नोडल अधिकारी, ३० सेक्टर ऑफिसर २,२९४ आवश्यक मतदान कर्मचारी कामकाज पाहणार आहेत. मतदानाच्या दिवशी पथके – १८ पथके असणार आहेत. यामध्ये ०६ स्थिर पथक , ०६ भरारी पथक आणि ०६ व्हिडीओ सर्वोलंस पथक स्थापन केली आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारांना ६ लाख तर पंचायत समिती निवडणूकसाठी ४ लाख खर्चाची मर्यादा आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून दौंड उपविभागीय अधिकारी रेवणनाथ लबडे तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार अरुण शेलार हे कामकाज पाहणार आहेत.