सौजन्य - नवराष्ट्र टीम
राज्यातील महापालिकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाने जोरदार मुसंडी मारल्याचे चित्र दिसून आले. पुणे महानगरपालिकेत १२० हून अधिक जागांवर भाजपाने विजय मिळवला आहे. प्रभाग क्रमांक २५ मधील चारही जागांवर भाजपाचे राघवेंद्र बाप्पु मानकर, स्वरदा बापट, कुणाल टिळक, स्वप्नाली पंडित हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. पुणे शहरासह संपूर्ण महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी निवडून येण्याची कामगिरी राघवेंद्र बाप्पू मानकर यांनी आपल्या पहिल्याच विजयात साध्य केली आहे. प्रभाग क्रमांक २५ मध्ये झालेल्या एकूण मतदानापैकी ३१ हजार ९८१ इतकी मते त्यांना मिळाली. तब्बल ७९.३४ टक्के मते राघवेंद्र बाप्पू मानकर यांना मिळाली आहेत.
त्यांच्या सोबतच पुणे महापालिकेत प्रभाग ३२-ब मधून भारतभूषण बराटे यांना २५ हजारांचे, तर प्रभाग ४-ब मधून रत्नमाला सातव यांना २३ हजारांचे मताधिक्य मिळाले आहे. मुंबई महापालिकेत निल सोमय्या यांनी १५ हजार मतांचे मताधिक्य मिळवले असून, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत नितीन निकाळजे हे सर्वाधिक मताधिक्याने विजयी झाले आहेत.
या विजयानंतर प्रतिक्रिया देताना राघवेंद्र बाप्पू मानकर म्हणाले, “माझ्या प्रभागातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी उभे केलेले भाजपाचे संघटन, पदाधिकाऱ्यांचे अथक परिश्रम, मित्र परिवाराने प्रचारात केलेले काम, आणि नागरिकांसाठी कामांमध्ये ठेवलेले सातत्य यामुळे मला हा मतरुपी भरभरून आशीर्वाद मिळाला. या विश्वासाबद्दल आणि प्रेमाबद्दल प्रभागातील सर्व नागरिकांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. राज्यात सर्वाधिक मताधिक्य हा केवळ निवडणुकीचा निकाल आहे, प्रभागाला पुण्यासह राज्यात सर्वाधिक विकसित करण्यावर माझा भर असेल.”
हे सुद्धा वाचा : पुण्यात भाजपने शतक ठाेकले, राष्ट्रवादीला धाेबीपछाड; ‘हे’ दिग्गज नेते पराभूत






