
ग्रामस्थांना दिलासा! पाटस गाव तलाव क्षेत्राची 'या' तारखेला होणार शासकीय मोजणी
पाटस : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या पाटस गाव तलावाच्या क्षेत्राची सोमवार, २० जुलै २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता शासकीय मोजणी होणार आहे. तलावातील अतिक्रमण आणि क्षेत्रफळाबाबतची तफावत दूर करण्यासाठी दौंड भूमी अभिलेख विभागाने संबंधितांना नोटीस बजावली आहे. मागील कित्येक वर्षांपासून पाटस गाव तलावातील अतिक्रमण आणि तलावाचे नेमके क्षेत्रफळ किती ? याबत वाद होता.
दिवसेंदिवस तलावाचे क्षेत्र कमी होत असल्याने पाणीसाठा अत्यंत घटला होता. तलावाच्या भोवताली झालेल्या अतिक्रमणांनी विळखा घातल्याने हा मुद्दा गंभीर बनला होता. त्यामुळे गावतलाव क्षेत्राची शासकीय मोजणी करून हद्द कायम करण्याची मागणी ग्रामस्थांनी दौंडचे तहसीलदार अरुण शेलार यांच्याकडे केली होती. ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेऊन तहसीलदार शेलार यांनी दौंड भूमी अभिलेख कार्यालयाला त्वरित शासकीय स्तरावर मोजणी करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने भूमी अभिलेख विभागाने मोजणीची नोटीस बजावली आहे. मोजणीसाठी पाटस मंडल अधिकारी, महाराष्ट्र शासन राखीव वनक्षेत्र विभाग, प्रकल्प संचालक – भारतीय राष्ट्रीय राजमार्ग विभाग तसेच तलावालगतच्या संबंधित शेत जमीन मालकांना नोटीस देण्यात आली आहे. तसेच भूकरमापकासोबत मोजणीच्या दिवशी दिवसभर हजर राहावे. तसेच मोजणी अंती संबंधित खातेदारांनी आणि विभागांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे, अशा सूचनाही नोटीसमध्ये देण्यात आल्या आहेत.
मोजणीनंतर तलावाची नेमकी हद्द निश्चित होऊन अतिक्रमणांवर कारवाईचा मार्ग मोकळा होणार असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान, पाटस येथील गाव तलावाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी लक्ष घातले आहे, या प्रकरणात कोणतीही दिरंगाई न करता, तातडीने तलाव क्षेत्राची मोजणी करून तलाव क्षेत्राचे हद्द कायम करावे, तलाव अतिक्रमणमुक्त करावे, अशा सूचना मंत्री बावनकुळे यांनी पुणे जिल्हाधिकारी यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
तर दौंड चे आमदार राहुल कुल यांनी या प्रकरणात लक्ष घालून तलावाचे क्षेत्राची हद्द कायम व्हावी, तलाव अतिक्रमणमुक्त करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात याव्यात. तलाव लगतचे अतिक्रमण काढले गेल्यास पाटस ते कुसेगाव अष्टविनायक रस्त्यावरचा मोठा अडथळा निघणार आहे. परिणामी पाटस येथील राजमाता अहिल्याबाई होळकर चौकातील वाहतूक कोंडी, तसेच भीमा सहकारी साखर कारखान्याच्या ऊस वाहतुकीचा प्रश्नही मार्गी लागणार आहे. त्यामुळे आमदार कुल यांनी कोणतेही राजकारण न करता आणि अतिक्रमणधारकांना पाठीशी न घालता याप्रश्नांकडे गांभीर्याने पाहावे अशी मागणी पाटस ग्रामस्थांकडून होत आहे.