सौजन्य - सोशल मिडीया
पुणे : शिवाजीनगर परिसरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाय म्हणून साखर संकुल ते जुना पुणे–मुंबई रस्ता या दरम्यान उड्डाणपूल (ग्रेड सेपरेटर) उभारण्याच्या सुमारे ७३.५२ कोटी रुपयांच्या प्रकल्पाला पुढील प्रशासकीय टप्प्यात नेण्यात आले आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ मधील कलम ७२ (ब) अंतर्गत या कामासाठी ७३ कोटी ५१ लाख ६९ हजार २५० रुपयांचे आर्थिक दायित्व स्वीकारण्यास मुख्य सभेची मान्यता मिळावी, यासाठी महापालिका आयुक्तांनी स्थायी समितीमार्फत प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्याने या प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे. अशी माहिती समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.
शिवाजीनगर येथील साखर संकुल परिसरातून जुना पुणे–मुंबई रस्त्याकडे जाण्यासाठी सध्या वाकडेवाडी अंडरपासचा वापर केला जातो. मात्र या अंडरपासची वाहतूक क्षमता अपुरी पडत असल्याने सकाळ व संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिक, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच स्थानिक आमदारांकडून सातत्याने करण्यात येत होती. त्यानुसार महापालिकेच्या प्रकल्प विभागाने उड्डाणपूल अथवा ग्रेड सेपरेटर उभारण्याचे नियोजन केले आहे. या प्रकल्पासाठी १४ ऑगस्ट २०२५ रोजी मे. प्रितम एन्टरप्रायजेस यांची तज्ज्ञ सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. सल्लागार संस्थेने परिसराचे टोपोग्राफिकल सर्वेक्षण, भूगर्भीय तपासणी तसेच वाहतुकीचा अभ्यास करून रेल्वे उड्डाणपुलाचा आराखडा तयार केला. त्यानंतर सविस्तर आराखडे, अंदाजपत्रक आणि तांत्रिक माहिती प्रकल्प विभागाकडे सादर करण्यात आली.
तांत्रिक छाननी समितीने मंजुरी दिली
या कामासाठी ७३ कोटी ५१ लाख ६९ हजार २५० रुपयांचे पूर्वगणनपत्रक तयार करण्यात आले असून त्याला २० नोव्हेंबर २०२५ रोजी तांत्रिक छाननी समितीने मंजुरी दिली आहे. त्यानंतर निविदा प्रक्रिया राबविण्यासाठी आवश्यक प्रशासकीय मान्यताही महापालिका आयुक्तांनी १९ जानेवारी २०२६ रोजी दिली. आता या प्रकल्पासाठी आवश्यक आर्थिक दायित्व स्वीकारण्याचा प्रस्ताव मुख्य सभेसमोर ठेवण्यात येणार आहे. महापालिकेच्या २०२५-२६ च्या मूळ अर्थसंकल्पात या कामासाठी तरतूद नव्हती. मात्र वर्गीकरणाद्वारे २ कोटी ६० लाख रुपयांची प्रारंभिक तरतूद उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने ५ जानेवारी २०२६ रोजी मंजूर केला. त्यानंतर १९ जानेवारी २०२६ रोजी मुख्य सभेनेही या वर्गीकरणास मान्यता दिली. या निधीतून प्रारंभिक कामे सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
दीड वर्षांत काम पूर्ण करण्याचे नियोजन
महापालिकेच्या नियोजनानुसार हा उड्डाणपूल पावसाळ्याचा कालावधी वगळता सुमारे दीड वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मात्र प्रकल्पाची एकूण किंमत लक्षात घेता उर्वरित निधी पुढील दोन वर्षांच्या आर्थिक अंदाजपत्रकातून टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून द्यावा लागणार आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम ७२ (ब) नुसार अशा प्रकारच्या बहुवर्षीय खर्चासाठी मुख्य सभेची मंजुरी आवश्यक असल्याने हा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. प्रकल्पामध्ये मुख्य उड्डाणपूल उभारण्याबरोबरच पाणीपुरवठा व निचरा वाहिन्यांचे स्थलांतर, स्लिप रोड, पर्जन्यजल वाहिनी, विविध नागरी कामे, गुणवत्ता तपासणी, रॉयल्टी, विमा आणि वस्तू व सेवा कर (जीएसटी) यांचा समावेश करण्यात आला आहे. या सर्व बाबींचा विचार करून सुमारे ७३.५२ कोटी रुपयांचा एकूण खर्च निश्चित करण्यात आला आहे.






