बारामती / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : बारामती शहरातील मोठा उद्योजक व बारामती नगरपरिषदेच्या माजी पदाधिकाऱ्याने लैंगिक शोषण केल्याचा आरोप करत पुण्यातील एक महिलेने बारामती शहरातील उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांच्या निवासस्थानासमोरच आत्मदहनाचा (Attempt of Self Immolation) प्रयत्न प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्या महिलेला आत्मदहनापासून रोखत ताब्यात घेतले.
या महिलेने बारामतीतील एका बड्या व्यक्तीने आपले १३ वर्षे शोषण केल्याचा आरोप केला आहे. हा माजी पदाधिकारी व उद्योजक राष्ट्रवादी काँग्रेसविरोधी आहे. महिलेने केलेल्या आरोपासंबंधित प्रकरण हे बिबवेवाडी पोलिसात दाखल आहे. मात्र, पोलिसांनी दखल न घेतल्याने या महिलेने थेट बारामती गाठली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती शहरातील भिगवण रोडवरील सहयोग भवन याठिकाणी आत्मदहन करण्यासाठी ती पोहचली.
सोमवारी (दि. १५) सकाळी १० च्या सुमारास हा टोकाचा निर्णय तिने घेतला. मात्र, याबाबतची माहिती पोलिसांना मिळाल्याने ती महिला पोहोचण्याअगोदर पोलिस अलर्ट झाले. तिला ताब्यात घेतल्याने मोठा अनर्थ टळला.
दरम्यान, या महिलेचे पोलिसांकडून समुपदेशन करीत मत परिवर्तन करण्यात आले आहे. यापुढे अशा प्रकारचे टोकाचे पाऊल उचलणार नसल्याचे महिलेने लेखी दिले आहे.